<
एकीकडे लैंगिक शिक्षणाचा अभाव, दुसरीकडे निवडीचं-नकाराचं स्वातंत्र्य, सुरक्षितता आणि लैंगिक कलाचा स्वीकार हे सारं तरुण मुला-मुलींपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न
आपल्या भारतीय समाजात लैंगिकता हा विषय अत्यंत खासगी विषय समजला जातो. लैंगिक शिक्षणाची चर्चा होते; पण आजही शाळा-कॉलेजात त्याचं स्थान गेस्ट लेक्चर आणि एक्स्ट्रा लेक्चर पुरतं मर्यादित आहे. खरं तर आपल्या समाजात लैंगिक शिक्षणाबद्दलचं अज्ञान, अंधश्रद्धा पाहता लैंगिक शिक्षण हा विषय सक्तीचा हवा; पण तो त्याविषयी बोलणं टाळणं हाच सर्वत्र एककलमी कार्यक्रम दिसतो.
लैंगिक शिक्षण म्हणजे सेक्स, असं नाही. आपलं शरीर, जनेंद्रिय, वयात येताना होणारे बदल, हे बदल होत असताना होणारे परिणाम, गर्भधारणा, मासिक पाळी अशा अनेक बाबींचा समावेश त्यात होतो. मात्र शास्त्रीय माहितीचा अभाव असतो. कुणी शास्त्रीय माहिती मोकळेपणानं देत नाही. सगळ्यांनाच सगळं कळतं असं मानून चालतात. मात्र तसं नसतं, वयात येणार्याच काय पण तरुण मुला-मुलींनाही अनेक प्रश्न असतात. कुणाशी तरी बोलायचं असतं. पण तशी व्यक्ती उपलब्ध नसते, मग आताशा त्यांच्या हाती नवीन उपकरण आलं आहे. माहिती हवी असली की कर गुगल. मात्र नेटवर माहिती शोधताना फक्त शास्त्रीय आणि आरोग्यहिताचीच माहिती मिळेल असं काही नाही. तिथं सगळाच सताड उघडा मामला. एकीकडे लैंगिकतेविषयी काहीच शिक्षण नाही आणि दुसरीकडे इंटरनेटनर काय आणि कसं शोधावं, याला कोणतेच नियम नाही. अशा वेळेत योग्य माहितीऐवजी चुकीची माहिती, भलत्याच साइट सापडल्या की त्यातून काही गैरसमज निर्माण होतात. त्याचे गंभीर परिणाम त्या व्यक्तीवर, त्याच्या कुटुंबावर, समाजावर होऊ शकतात. इंटरनेटच्या माध्यमातून जेव्हा माहिती शोधतो त्यावेळी त्या माहितीची सत्यता पडताळण्याची कोणतीच यंत्रणा नाही. अशा परिस्थितीत लैंगिकतेसारख्या संवेदनशील विषयावर माहिती देणारे योग्य पर्याय निर्माण होणं हे खूप महत्त्वाचं आहे.
याच संवेदनशील मुद्दय़ावर तरुणांशी संवादाचा प्रयत्न पुण्यातील ‘तथापि ट्रस्ट’ letstalksexuality.com या वेबसाइटच्या माध्यमातून करत आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाने उपलब्ध करून दिलेली ‘स्पेस’ सकारात्मक आणि प्रभावी पद्धतीने वापरणं हा यामागचा उद्देश आहे. ‘सेक्स आणि बरचं काही’ ही या वेबसाइटची टॅग लाइन आहे. या टॅगलाइनमध्ये अनेक अर्थ सामावले आहेत. शरीरसंबंधांपलीकडचे प्रश्न, याशिवाय अपंगत्व आणि लैंगिकता यासारख्या दुर्लक्षित विषयांवर माहिती दिली जाते. लैंगिकता ही संकल्पना यापेक्षा खूप व्यापक आहे. प्रेम-मैत्नी-आकर्षण, निरनिराळे लैंगिक कल, आवडी-निवडी, लिंग आणि लिंगभाव, आरोग्य, अन्याय आणि हिंसा अशा अनेक गोष्टींचा समावेश लैंगिकतेच्या संकल्पनेत होतो. या वेबसाइटवर या सर्व विषयांवर तरुणांशी मोकळा संवाद साधला जातो. याशिवाय ग्रामीण, आदिवासी भागात, शहरात अशा ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. इथं मुलांना आपलं म्हणणं मांडता येतं, प्रश्न विचारता येतात आणि त्यांच्या शंकांना उत्तरंही दिली जातात.(http://letstalksexuality.com/ask-questions/)
संमती आणि सुरक्षितता
संमती – र्लैंगिक व्यवहारात सामील असलेल्या आणि कायद्यानं सज्ञान असलेल्या व्यक्तींनी विनासंमती केलेला व्यवहार कायद्याने जसा गुन्हा समजला जातो तसाच तो एखाद्या व्यक्तीच्या खासगीपणाच्या अधिकाराचेही उल्लंघन असतो.
सुरक्षितता – हेही तेवढंच महत्त्वाचं मूल्य आहे. मग सुरक्षितता आजार आणि संक्रमणापासून असो की नको असलेल्या गर्भधारणेपासून. लैंगिक व्यवहारातील असुरक्षितता विशेषत: मुलींच्या एकूणच आयुष्यावर गंभीर परिणाम करू शकते. लैंगिकतेची चर्चा करताना लिंगभाव समानता, भिन्न लैंगिक कलांबद्दलचा स्वीकार, समोरच्या व्यक्तीबद्दल आदर आणि निवडीचे स्वातंत्र्य या मूल्यांनाही तितकंच महत्त्व आहे याबाबतचं मार्गदर्शनही तरुण मुलांना केलं जातं.
सहभागातून संवाद
वाचकांना आपल्या मनातील, आपल्या लैंगिकतेशी संबंधित कुठलाही प्रश्न इथे विचारता येतो. ज्याचे उत्तर तीन ते चार दिवसांच्या आत त्यांना दिले जाते. त्यासाठी त्यांना आपली ओळख जाहीर करण्याची किंवा इतर काही माहिती देण्याची गरज नसते. बहुतेक प्रश्नांची उत्तरं तथापिचे प्रशिक्षित कार्यकर्ते देतात; पण जिथे तांत्रिक किंवा औषधं, आजारांशी संबंधित प्रश्न असतात तिथे लैंगिकतेच्या क्षेत्नातील तज्ज्ञ व्यक्ती, डॉक्टर्स यांची एक टीम त्या त्या प्रश्नांची उत्तरं देतात. वैज्ञानिक दृष्टिकोन, संवेदनशीलता, लैंगिकता, शिक्षण आणि आपुलकी ही तत्त्व प्रत्येक उत्तर देताना काटेकोरपणे पाळली जातात. असं तथापि ट्रस्टचे सदस्य अच्युत बोरगावकर सांगतात.
अधिक माहितीसाठी – http://www.tathapi.org/
‘स्रोत – तथापि ट्रस्ट निर्मित Let’s Talk Sexuality – सेक्स आणि बरंच काही’