थप्पड चित्रपटाच्या निमित्ताने ….

आज २१ व्या शतकातही उच्चवर्णीय असो अथवा मोलमजुरी करणारी स्त्री असो, कोणत्याही वर्गातली, कोणत्याही समाजातली असो, विवाहित/अविवाहित असो अथवा विधवा असो; स्वतःचं पूर्ण आयुष्य पणाला लावूनही भारतीय स्त्री ही कायम दुय्यम स्थानीच असते आणि तिचं ते दुय्यम स्थान इतर सर्व जगासोबत तिने स्वतःही गृहीत धरलंय. त्यामुळंच स्त्रियाही या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेच्या बळी पडून वाहक झालेल्या आहेत. हे आजही दुर्दैवी वास्तव आहे, याचंच उदाहरण थप्पड या चित्रपटाच्या माध्यमातून देण्यात आलं आहे.“कोणत्याही स्त्री साठी तिचा संसार, घर, नातेवाईक, शेजारी-पाजारी या सगळ्यांनी मिळून बनलेला तथाकथित समाजच महत्वाचा असतो/असला पाहिजे, काहीही झालं तरी तिनेच हे टिकवलं पाहिजे, या सगळ्यातला समतोल साधून प्रसंगी अथवा नेहमी स्वतःच्या मतांचा, स्वप्नांचा त्याग तिने केला पाहिजे”. याचा धडा बहुतकरून सर्व आई-वडील त्यांच्या मुलींना लग्न व्हायच्या आधी कित्येकदा देतात आणि लग्नानंतरही देत राहतात! पण हा धडा देताना ते हे साफ विसरून जातात की तीही एक माणूस आहे, तिच्याही काही इच्छा, अपेक्षा, स्वप्नं असतात, तिलाही भावना असतात, तिलाही अभिव्यक्त होण्याचा हक्क आहे, प्रश्न विचारण्याचाही हक्क आहे आणि प्रसंगी हा समतोल साधणं झुगारून ही अन्यायी बंधनं तोडण्याचा सुद्धा अधिकार आहे.
हा धडा फक्त मुलींनाच देण्याऐवजी पालकांनी आपल्या मुलांना सुद्धा योग्य तो धडा द्यायची आजच्या काळाजी गरज आहे.
आपल्या घरासाठी एखादी मुलगी लग्न करून तिचं पूर्ण आयुष्य खर्ची करत असेल तर तिला आपल्याकडून त्या प्रती योग्य तो आदर आणि प्रेम मिळालं पाहिजे याची काळजी घेण्याचा एक धडा मुलालाही शिकवला गेला पाहिजे, ही काळाची गरज थप्पड या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आली आहे.“कई बार सही करने का रिझल्ट हॅप्पी नही होता” , हा दिलासा देणारा आश्वासक संदेश मुलीला देणारे मुलीचे वडील खरं तर वास्तवात प्रत्येक मुलीला भेटतातच असं नाही. असा विश्वास देणाऱ्या वडिलांची खरी गरज असते मुलींना. त्यामुळं या चित्रपटातुन वडील-मुलीच्या आदर्श नात्याचं भावविश्वही उत्तमरीत्या मांडलंय.
थप्पड हे एक पुरुषप्रधान विचारांचं रिफ्लेक्शन असलं तरी इतर अनेक कृती ज्या हेच विचार दर्शवतात; मग ते प्रत्यक्ष थप्पड न मारता अनादर करणाऱ्या शब्दांचा जाचक मार असो वा सोयीनुसार बदललेल्या भूमिका असो.. अशा प्रत्येक अन्यायाच्या क्षणी मुलीला ज्या मानसिक आधाराची गरज असते आई-वडिलांकडून कारण त्यांच्या संसारात त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांचं निरीक्षण करतच मुलीचं विचार/भावविश्व घडत असतं.
त्यामुळे आई-वडिलांमधील नातं ज्या पायावर उभारलं आहे तो पायाही आदरयुक्त, विवेकी प्रेम, समानता आणि समंजसपणा, विश्वासाचा असेल तर ही थप्पड काय पण तिच्यामागे असलेल्या संकुचित पण वर्चस्वशाली विचारांचाही शिरकाव कुठे होत नाही, परिणामी हे चित्र पाहणाऱ्या तरुण मुला-मुलींच्या विचारविश्वातही मग हा विषय कधी येऊ शकत नाही! हे पालकांनीही समजून घ्यायला हवं यातून.
पुरुषप्रधान व्यवस्थेत जगताना मुलींनी, स्त्रियांनी आपणही त्याच्या वाहक बनत नाहीयत ना? वाहक बनून आपल्या पुढच्या पिढीकडे आपण ही संकुचित विचारांची चौकट पास करत नाहीयत ना? परिणामी समस्त स्त्री-वर्गावर होण्याऱ्या अन्यायाला आपणही कुठंतरी कारणीभूत नाहीयत ना? हे तपासायचं असेल तर, स्त्रियांनी हा चित्रपट नक्की पहावा. जेणेकरून तसं होत असेल तर त्यांना त्यांची चूक गवसून योग्य त्या सुधारणेला वाव मिळेल.
तसंच पुरुषांच्या बाबतीतही म्हणता येईल. मुलांनीही हे तपासण्याची गरज आहे की आपण आपल्या गर्लफ्रेंडसोबत/ बायको सोबत वागताना तिचा आत्मसन्मान दुखावला जात नाही ना, तिचं व्यक्तिस्वातंत्र्य, माणूसपण अबाधित राहील याची काळजी घेतोय ना. म्हणजेच तरुण मुलं-मुली, पालक (असलेले आणि होऊ पाहणारेसुद्धा आणि ज्येष्ठ सुध्दा!) अशा सर्वांनी हा चित्रपट पहावा.
प्रस्थापित पुरुषप्रधान समाजव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय क्षुल्लक असणारी एक थप्पड! ती सहन करणारी स्त्री तीच थप्पड त्या व्यवस्थेवर उलटवण्याचं आत्मधैर्यही बाळगते हे मात्र या समाजाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि याची जाणीव होण्यासाठी प्रत्येकाने हा चित्रपट पाहिला पाहिजे.
– अस्मिता नेवसे-asmitaas198@gmail.com
– चित्र साभार : t series
‘स्रोत – तथापि ट्रस्ट निर्मित Let’s Talk Sexuality – सेक्स