<
पाचोरा- -(प्रमोद सोनवणे) – येथील भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी कोरोना (कोविड-१९) या महामारी चा वाढता प्रादुर्भाव बघता पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शहरांसह ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेऊन दोघे तालुक्यातील आर्थिक व दुर्बल घटकांतील तसेच रोजंदारी कामगारांसह हातावर पोट भरणार्या नागरिकांच्या आणि रेशन कार्ड धारकांना धान्य मिळविण्यात येणाऱ्या समस्यांबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांसह पाचोरा प्रांताधिकारी यांना त्यासंबंधी निवेदन देण्यात आले.त्यात प्रामुख्याने खालील मुद्दे अमोल शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.
१) आर्थिक व दुर्बल घटकातील व हातावर पोट भरणाऱ्या रोजंदारी कामगारांसह काही नागरिकांना शिधापत्रिका उपलब्ध नसल्याने त्यांना शासनाच्या माध्यमातून धान्य मिळण्यासाठी उपाय योजना करण्यात यावी.
२) काही नागरिकांना शिधापत्रिका असून देखील १२ अंकी नंबर नसल्याने धान्य मिळविण्यास अडचणी उपस्थित होत आहेत परंतु त्यांना नियमात शिथिलता आणून चालू महिन्यापासून धान्याची त्वरित व्यवस्था करून देण्यात यावी.
३) केशरी शिधापत्रिकाधारकांना देखील चालू महिन्यापासून धान्य मिळावे तसेच त्यांना मिळणारे सदर धान्य अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मिळणार या दराने मिळावे.
४)प्रत्येक महिन्याला गहू व तांदूळ सोबत डाळी देखील बाजारभावापेक्षा अल्पदरात उपलब्ध करून देण्यात याव्यात.
५) स्वस्त धान्य पुरवठादारांना वाढीव पुरवठा करून नागरिकांना वेळेवर सुरळीत पुरवठा होणे बाबत उपाय योजना करण्यात यावी.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने संचारबंदी अजून वाढवण्याचे जाहीर केले असल्याने शासनाने सदर निवेदनात उपस्थित केलेल्या समस्यांवर लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी विनंती त्यांनी या निवेदनाद्वारे केली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी तालुका सरचिटणीस गोविंद शेलार व संजय पाटील उपस्थित होते.