नागरीकांनी काळजी करु नये पण काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
जळगाव, दि. 22 (जिमाका) – कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज (22 एप्रिल) पर्यंत 356 कोरोना संशयीत रुग्णांच्या स्वॅबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 288 संशयित रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज (22 एप्रिल) रोजी स्क्रिनिंग ओपीडी मध्ये एकुण 96 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 25 रुग्णांना संशयीत म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत. तर आजपर्यंत ओपीडीमध्ये स्क्रिन केलेल्या रुग्णांची एकुण संख्या 4 हजार 558 इतकी आहे.
महाविद्यालयात आतापर्यंत एकुण 356 संशयीत रुग्णांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 288 संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आले असून 5 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यामधील एक रुग्ण बरा होऊन घरी परत गेला असून 2 रूग्णांचा मृत्यु झाला आहे. तर दोन रुग्णांवर कोरोना संसर्ग कक्षात उपचार सुरु आहेत. तसेच 2 रुग्णांचे अहवाल रद्द करण्यात आले असून उर्वरित 61 रुग्णांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत.
जिल्ह्यात 21 एप्रिल रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 11 व्यक्तींना रुणालयात दाखल करण्यात आलेले असून त्यांचे स्वॅब घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर रुग्णालयात 21 एप्रिल, 2020 रोजी 3 कोरोना संशयीत रुग्णांचा मृत्यु झाला होता. या रुग्णांच्या स्वॅबचे नमुने श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धुळे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेले असून या रुगणांच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल अद्याप पावेतो अप्राप्त असल्याचे डॉ. खैरे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवित आहेत. असे असूनही जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरीकांनी घाबरुन जावू नये. लॉकडाऊनचे पालन केल्यास कोरोनाची साखळी तोडणे शक्य आहे. नागरीकांनी लॉकडाउनच्या काळात घरातच रहावे, कोणीही विनाकारण बाहेर पडून गर्दी करु नये. आवश्यकता असेल तरच जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी कुटूंबातील एकाच व्यक्तींने आवश्यक ती काळजी घेऊन खरेदी करावी. नागरीकांनी काळजी करु नये पण काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले आहे.