<
कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे होत असलेल्या “कोविड – १९” या भयंकर अशा साथ रोगाच्या दहशतीखाली संपूर्ण विश्व चिंतेत अहे. आपल्या भारतातील सद्यस्थितीतील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी ही भयावह आहे. पण त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे या साथरोगातून संपूर्णपणे बरे (कोरोनामुक्त) होणाऱ्यांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे.
म्हणूनच भारतीय वैद्यकीय संशोधक या भयंकर अशा साथरोगामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या टक्केवारीत घट व्हावी म्हणून अत्यंत चिंताजनक (क्रिटीकल) असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांवर नेहमीच्या उपचारपद्धती बरोबरच प्लाझ्मा थेरेपी या उपचार पद्धतीचा वापर करण्यासाठी उत्सुक होते व काही प्रायोगीक उदाहरणांमुळे सकारात्मक दिशा मिळू लागल्याने आय.सी.एम.आर. व आरोग्य मंत्रालय यांनी काही दिवसांपूर्वी प्लाझ्मा उपचार पद्धतीला अशा रूग्णांवर वापरण्यासाठी तत्त्वत: मान्यता दिली आहे.
प्लाझ्मा थेरेपी म्हणजे काय?
‘कोविड – १९’ या साथरोगातून पूर्णपणे बरा (आजारमुक्त) झालेल्या व्यक्तीचे प्लाझ्मा (रक्तातील द्रव घटक) काढून ते अतिगंभीर कोरोनाग्रस्ताच्या शरीरात चढवणे अशी उपचारपद्धती असते. मानवी शरीरातील रक्तामध्ये लाल पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स व प्लाझ्मा हे घटक असतात. याच प्लाझ्मा च्या सहाय्याने आवश्यकतेनुसार प्रतिरोधक क्षमता असलेली प्रतिपिंडे (अॅन्टीबॉडीज) तयार केली जातात. कोरोनाच्या आक्रमणानंतर त्या कोरोनाग्रस्ताचे शरीर विषाणूविरूद्ध लढायला सुरूवात करते. प्लाझ्माच्या सहाय्याने तयार प्रतिपिंडे (अॅन्टीबॉडीज) त्या विषाणूला लढा देतात. हे प्रतिपिंडे एक नैसर्गिक औषध असते जे त्या विषाणूला प्रभावीपणे प्रतिबंध करते. शरीरातील कोणत्याही विषाणूस विंâवा बाह्य संसर्गास हे प्रतिपिंडे पेशींमध्ये सामील होण्यापासून रोखतात. व्हायरसचा गुणाकार थांबविण्याचे नैसर्गीक व प्रभावी कार्य ते करते. म्हणूनच शरीरात पुरेशा अॅन्टीबॉडीज (प्रतिपिंडे) तयार झाल्या तरच कोरोनाचा नायनाट होतो व बऱ्या झालेल्या रूग्णाचे प्लाझ्मा (ज्यामध्ये अॅन्टीबॉडीज) आहेत असे गंभीर असलेल्या कोरोनाग्रस्तास चढविले तर त्याचे जीवन वाचू शकते.
१) साधारणत: डोनरच्या कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्याच्या दोन आठवड्यानंतर तो प्लाझ्मा दान करू शकतो.
२) रक्तदानासारखीच ही प्रक्रिया असते त्यामुळे इतर टेस्ट करून ही प्रक्रिया पार पाडली जाते.
३) साधारणत: ४०० मि.ली. प्लाझ्मा काढले जाते. एका वेळेस दोन कोरोनाग्रस्तांवर उपचार होऊ शकतात.
प्लाझ्मा थेरेपी प्रभावी आहे का?
खरे तर प्लाझ्मा उपचार पद्धती नवी नाही. १०० वर्षांपूर्वीची ही उपचारपद्धती आहे. जर्मन फिजीओलॉजिस्ट एमिल वॉन बेहिंग यांनी ही उपचार पद्धती विकसीत केली आहे.विशेष महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील पहिले नोबेल पारितोषीकप्राप्त संशोधक म्हणून त्यांची नोंद केली गेली.
१) प्लाझ्मा थेरेपीचा वापर यापूर्वी २०१० साली एबोला विषाणू संक्रमण, २०१५ मध्ये MERS (मिडल इस्ट रिस्पायरेटरी सिन्ड्रोम), तर स्वाईन फ्ल्यू (SARS) या संक्रमणाच्या वेळी पाश्चिमात्य देशांमध्ये केला गेलेला आहे.
2) डिसेंबर २०१९ मध्ये चीन मध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर त्या ठीकाणी ही प्लाझ्मा थेरेपीचा वापर केला गेला होता व त्यास बऱ्यापैकी यश मिळाले होते. तर नुकतेच अमेरीका व इतर देशातही या उपचार पद्धतीचा वापर होत आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील एक अतिगंभीर रूग्णावर प्लाझ्मा उपचार पद्धतीने उपचार केले गेले होते व त्या रुग्णाची प्रकृती त्यानंतर सुधारली होती.
प्लाझ्मा उपचार पद्धतीचे काही धोके आहेत का?
१) रक्तसंक्रमणाचे जे काही धोके असतात तेच धोके प्लाझ्मा उपचार पद्धतीत असतात.
२) काहीअंशी रोग प्रतिकार शक्तीवर परिणाम होण्याची भिती असते. (क्वचित प्रसंगी)
वरील बाबींचा विचार केल्यास प्लाझ्मा उपचार पद्धती कोरोनाग्रस्तांसाठी आशेचा किरण म्हणून दिसत असली तरी या बाबतीत काही गोष्टी दुर्लक्षून चालणार नाही जसे की,
१) या उपचार पद्धतीबाबत संशोधन करतांना कमी संख्येच्या प्रयोगांचा अभ्यास केला गेला आहे.
२) अॅन्टीबॉडीजची संख्या (क्षमता) निर्धारीत करणेची पद्धत.
३) त्याच प्रमाणे कोरोनामुक्त झाल्यानंतर किती महिन्यांपर्यंत प्लाझ्मा दान केल्यास या उपचारास चांगले यश मिळू शकते व कोरोनाच्या कोणत्या टप्प्यावर ही उपचार पद्धती सगळ्यात जास्त उपयुक्त ठरेल या बाबतीत संशोधनात परिपूर्णता आल्यानंतरच या पद्धतीचा वापर वाढेल यात शंका नाही.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र व दिल्ली शासनाने या उपचार पद्धतीस वापरण्यासाठी आय.सी.एम.आर. कडे मागितलेल्या परवानगीस तत्त्वत: मंजुरी मिळाली असल्यामुळे वरील सर्व प्रश्नांची, संभाव्य बाबींचा चोहोबाजूंनी अभ्यास व संशोधन करूनच, योग्य त्या देश – विदेशातील चाचण्यांचा अभ्यास करूनच प्लाझ्मा उपचार पद्धतीस मान्यता मिळाली आहे यात शंका नाही. त्याचप्रमाणे हे देखील नमूद करावेसे वाटते की वैद्यकीय क्षेत्रातील अनेक डॉक्टर्स, अतिदक्षतागृह विशेषज्ज्ञांनी प्लाझ्मा उपचार पद्धीस मान्यता मिळावी म्हणून मागणी केली होती. कारण जे रूग्ण अतिगंभीर अवस्थेत कृत्रिम श्वास यंत्रणेवर आहेत अशा रुग्णांना या प्लाझ्मा थेरेपीचा नक्कीच फायदा होणार आहे.
प्लाझ्मा उपचार पद्धतीचे स्वागत करत असतांनाच आपण हे विसरता कामा नये की, सरसकट प्रत्येक कोरोनाग्रस्तासाठी ही उपचार पद्धती लागू होणार नाही तर अनेक कोरोनाग्रस्तांवर ती अवलंबली जाणार नाही. त्यामुळे प्रशासनाने निर्देश केलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, विनाकारण घराबाहेर न पडणे, वारंवार साबणाने किंवा हॅडवॉशने हात धुणे, तोंडावर मास्क बांधणे, सार्वजनिक ठीकाणी किंवा इतरत्र थुंकण्याच्या सवयीत बदल करणे, खोकलतांना किंवा शिंकताना योग्य त्या पद्धतीचा वापर करणे. वापरलेले मास्क व टिश्यू पेपर बंद असलेल्या डस्टबीनमध्ये विल्हेवाटासाठी टाकणे या साध्या साध्या गोष्टींकडे लक्ष देऊन आपण स्वत: त्या अंगिकारून, इतरांना करण्यासाठी प्रवृत्त केले तरच आपण कोरोनाला हरवू शकतो.
|| लढा कोरोनाशी ||
डॉ. नरेंद्र ठाकूर
नगरसेवक, न.पा. एरंडोल
संचालक, सुखकर्ता फाऊंडेशन
संपर्कसूत्र : ९८२३१ ३७९३८