जळगांव(प्रतिनीधी)- आज आपण महाराष्ट्राचे हिरक महोत्सव साजरे करीत आहोत! आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! गेल्या साठ वर्षात राजकीय, सामाजिक, आर्थिक तसेच अनेक क्षेत्रात आपण आदर्शवत कामगिरी केली आहे. मात्र साठीतला महाराष्ट्र जेव्हा आम्ही बघतो, तेव्हा पर्यावरण क्षेत्रात कुठतरी मागे पडतोय असे दृष्टीक्षेपात येते!
सध्या कोरोनाच्या थैमानात पर्यावरणाचे महत्व जेव्हा आपल्याला कळतय, तेव्हा ह्या बाबी आपल्यासमोर येण गरजेच आहे, अस मला वाटत! केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या मते, देशातील १०० अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रांच्या यादीत महाराष्ट्रातील ९ क्षेत्रांचा समावेश होतो, जे कि तारापूर, चंद्रपूर,औरंगाबाद, डोंबिवली, नाशिक, नवी मुंबई, चेंबूर, पिंपरी व महाड हि आहेत. आपल्याकडच्या सुमारे ७५००० कारखान्यांपैकी १२,५०० कारखाने अति प्रमाणात प्रदूषण करणारे आहेत.देशात वायूच्या मानकांबाबत अतिप्रदूषित ९४ शहरांमध्ये जळगावचा देखील समावेश आहे. एकूण महाराष्ट्रातील २० शहरे त्या यादीत आहेत. महाराष्ट्रातील ४९ नद्या ह्या अति गलिच्छ असल्याचे केंद्रीय प्रदूषण मंडळाचे निरीक्षण आहे. याच प्रमुख कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्रात कोणत्याही प्रक्रियेविना कारखान्यातील व शहरातील सांडपाणी नदीत सोडण्यात येते.आकडेवारीत पहायचे झाल्यास नाशिकमध्ये दररोज ३० लाख लिटर सांडपाणी गोदावरीत, कोल्हापुरात २ कोटी लिटर पाणी पंचगंगेत, अहमदनगरात सहा कोटी लिटर पाणी सीना नदीत तर आपल्या जीवाच्या मुंबईमध्ये १५० कोटी लिटर पाणी, नव्हे नव्हे घाणच समुद्राला अर्पण केली जात आहे.या दुषित पाण्यावर जी शेती केली जात आहे,त्या पिकांमुळे कॅन्सर सारखे दुर्धर रोग नागरिकांना होत आहे. जळगाव जिल्ह्याट जळगाव शहरातील पाणी थेट गिरणा नदीत सोडले जाते, शिवाय माझ्या निरीक्षणानुसार जिल्ह्यात कोठेही सांडपाणी प्रक्रिया केले जात नाही, ते थेट नदीत सोडले जातात. चोपड्यातील रत्नावती नदीचे गटारगंगेत झालेले रुपांतर आपण जाणतोच.येत्या काही वर्षात इतर नद्यांचीही तीच परिस्थिती निर्माण होणार आहे.अवैध वाळूउपसा झाल्याने घटणारी भूजलपातळी हा चिंतेचा विषय आहे. हवामान बदल ह्या संकटाचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे, शेतकरी आत्महत्या हा देखील त्याचाच परिणाम! राज्यात हवामानबदल समायोजन विभात कार्यान्वित करत धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे! आज साठीतल्या महाराष्ट्रातील युवकांच्या वतीने मी राज्य शासनास आवाहन करतो आहे कि महाराष्ट्राला हरित महाराष्ट्र बनवण्यासाठी सरकारने धोरण आखावे, त्याची काटेकोरपणे अमलबजावणी करावी, आम्ही सर्व युवक ह्याला जनचळवळीत रुपांतर करण्यासाठी मेहनत घेऊ व जेव्हा महाराष्ट्र आपले अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असेल तेव्हा आपला महाराष्ट्र हा हरित महाराष्ट्र झालेला असेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.