<
जळगांव(प्रतिनीधी)- अयोध्या नगर येथे जनमत प्रतिष्ठान, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान तसेच निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, अन्याय अत्याचार निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर अयोध्यानगर येथे दिनांक ३१ जानेवारी रोजी संपन्न झाले. रक्तदात्यांना श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक दाभाडे, नगरसेवक विरेंद्र खडके, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जिल्हा सहसचिव विजय लुल्हे यांच्या हस्ते केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीचे गौरव पत्र सन्मानपूर्वक देऊन प्रोत्साहित करण्यात आले. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्षा सुचित्रा महाजन जनमत प्रतिष्ठानच्या सचिव हर्षाली पाटील यांनी अमूल्य सहकार्य केले. शिबीर प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते किरण कोलते, अँड. हेमंत दाभाडे, चित्रा मालपाणी, सामाजिक कार्यकर्ते युवराज महाजन, रोहन महाजन यांसह रक्तपेढीचे वरिष्ठ कर्मचारी चंद्रकांत जोशी, उदय सोनवणे, सुनिल पाटील, समाधान चौधरी यांनी परिश्रम केले .