<
रुग्णांच्या सेवेत कुचराई
जळगांव(चेतन निंबोळकर)- गोर गरिबांचा आधार म्हणून जिल्हा रुग्णालयाची ओळख जिल्हाभरात आहे. सुविधेचा कितीही अभाव असला तरीही रुग्णांचा कल हा “सिव्हिल” मध्ये वाढतच आहे. खाजगी रुग्णालयात होणार्या आर्थिक पिळवणूकीमुळे गरिबांचा हा एकमेव मार्ग म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. अशी परिस्थिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या व्यवस्थेवरुन स्पष्ट होत आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाचं नाव अनेक कारणांमुळे चर्चेत आले आहे. यावर लोकप्रतिनिधींनी आवाज उठवून देखील जिल्हा सामान्य रुग्णालयाची अवस्था “जैसे थे” आहे.
असाच काही प्रकार आमच्या सत्यमेव जयते च्या विशेष प्रतिनिधी ला आढळून आला. जसे की, जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज शेकडो गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र डाँक्टर हे वेळेवर येत नसल्याने रुग्णांना आपल्या वेदना सहन करत ताटकळत बसावे लागते. तसेच तेथील कर्मचारी देखील रुग्णांना सहकार्य करण्याच्या भुमिकेत दिसून येत नाही. केविलवाण्या स्वरात प्रश्न विचारणारे रुग्णांच्या नातेवाईकांना हटकने, सहकार्य तर सोडाच, मात्र त्यांना मार्ग न दाखवता कटू शब्दांत बोलणे, एवढेचं नव्हे तर रुग्णांना शिव्या घालणे, इथे येऊन आमच्यावर उपकार केले का? अशा शब्दांत ओरडणे. असे वर्षानुवर्षे दिसाणारे चित्र जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आहे. तेथील डाँक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना कोणाशीही काही घेणे-देणे नाही. सर्वच जण वेळ मारून देण्याच्या उद्देशाने काम करताना दिसत आहे. या सर्वांना रुग्णांच्या भावना समजून घेऊन त्यांच्यावर उपचार करण्याचा जणू विसरच पडला आहे.
आमच्या प्रतिनिधीने यावेळी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी बोलून त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. यात माणूसकी हरवलेले जिल्हा सामान्य रुग्णालय सामान्यांचे राहिलेच नसल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. तसेच अस्वच्छतेच्या बाबतीत देखील जिल्हा सामान्य रुग्णालय आघाडीवर आहे. तेथील स्वच्छतागृहांची दुर्वव्यवस्था, तेथे असलेल्या उंदरांचा सुळसुळाट, रुग्ण ज्या थाळीत जेवण करतात त्या थाळ्यांचा खिडकी बाहेर फेकलेला खच, पायर्यांवर गुटखा खाऊन थुंकलेलं असे काही अत्यंत किळसवाणे प्रकार तेथे दिसून येतात. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवीन इमारतीवर करोडोचा खर्च करून निकृष्ट दर्जाचे काम केले असून शासनाच्या पैशाचा चुराडा केला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात कामानिमित्त रोज नागरिकही मोठ्या प्रमाणात येत असतात. इमारतीचे उदघाटन झाल्यानंतर काही वर्षांतच इमारतीच्या आतील भिंतीचा आणि फरशीचा भाग उखटण्यास सुरुवात झाली. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवीन इमारतीवर करोडो रुपये शासनाने खर्च केले असले तरी ठेकेदारांच्या निकृष्ट कामामुळे हे करोडो रुपये पाण्यात गेले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता यांनी इमारतीचे बांधकाम मजबूत व टिकाऊ केले आहे का याबाबत पाहणी केली होती का? असा प्रश्नही यानिमित्ताने निर्माण झाला आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करणार्या ठेकेदारावर व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यावर काय कारवाई जिल्हा प्रशासनाकडून केली जाणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.