<
जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 16- जळगाव जिल्ह्यातील सर्व अन्न व्यवसायीकांना आवाहन करण्यात येते की, ज्या अन्न व्यावसायीकांनी अन्न परवाना किंवा नोंदणी घेतली नसेल तर अन्न परवाना / नोंदणी तात्काळ घ्यावे, तसेच ज्यांनी परवान्याचे किंवा नोंदणीचे नुतनीकरण केलेले नाही त्यांनी अन्न परवान्याचे किंवा नोंदणीचे नुतनीकरण तातडीने करुन घ्यावे. नोंदणी किंवा अन्न परवाना नसलेल्या अन्न आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल्. ज्यात पाच लाख रुपयांपर्यंत दंड आणि 6 महिने पर्यंत कारावासही होवू शकतो.
अन्न परवाना किंवा नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज www.foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर करावेत. परवाना किंवा नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करताना आस्थापनाने /पेढीमालकांने स्वत:चा मोबाईल नंबर तसेच स्वत:चा email id नमूद करावा.
तसेच यापूर्वी परवाना किंवा नोंदणी अर्ज करताना आस्थापनाने किंवा आस्थापना मालकाने स्वत:चा मोबाईल नंबर व ईमेल आयडी नमुद आहे किंवा नाही याची खात्री करावी व त्याअनुषंगाने बदल करुन घ्यावा,
तसेच ज्या अन्न आस्थापनांची वार्षीक उलाढाल रुपये 12 लाखाच्या पुढे आहे व त्यांनी नोंदणी प्रमाणपत्र घेतले आहे. त्यांनी त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र शासनाकडे जमा (सरेंडर) करुन अन्न परवानासाठी अर्ज करावा व विहीत अन्न परवाना प्राप्त करुन घ्यावा अन्यथा त्यांचेविरुध देखल अन्न सुरक्षा मानके कायदयाअंतर्गत कारवाई घेण्यात येईल. याबाबत मोहीम सुरु केली असून त्यात मे. ओम स्टोअर्स, जळगाव या पेढीचे वार्षिक उलाढाल रुपये 12 लाखाच्या पुढे असून देखील त्यांनी नोंदणी प्रमाणपत्र घेतल्यामुळे त्यांचेविरुध्द कारवाई घेवून त्यांना रु. 10,000/- दंड ठोठावण्यात आलेला आहे. व परवाना घेण्याचे निर्देष दिले आहेत. त्यामुळे अन्न व्यावसायिकांनी अन्न परवाना किंवा नोंदणी घेताना काळजीपूर्वक माहीती भरावी व परवान्यासाठी पात्र असताना नोंदणी घेवू नये, असे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई घेतली जाईल. तसेच विक्री बिलावर परवाना क्रमांक नमूद करणे बंधनकारक असून विक्री बिलावर परवाना क्रमांक नमुद नसेल तर त्याला दोन लाखापर्यंत दंड होवू शकतो व परवाना नसलेल्या आस्थापनेस अन्न पदार्थाची विक्री केल्यास दोन लाखापर्यंत दंड होवू शकतो.
अन्न पदार्थ तळण्यासाठी खादयपदार्थ उत्पादकांनी जास्तीत जास्त सदर खादयतेलाचा दोन वेळाच वापर करणे आवश्यक आहे. दोन वेळा वापरानंतर पुन्हा ते खादयतेल तळण्यासाठी वापरले तर त्यातील पोलर कंपाऊंडचे व ट्रान्सफॅटचे प्रमाणे वाढून ते आरेाग्यावर विपरीत परिणाम करतो. हि बाब संशोधनाअंती आढळून आली आहे व त्यामुळे कर्करोग, ह्दयविकार व पचनासंबंधी आजार होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे याबाबत वेळोवेळी कारवाया घेतल्या जाणार आहेत. जे अन्न व्यवसाईक खादयतेलाचा वापर वारंवार तळण्यासाठी करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांचेवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व त्याअंतर्गत नियम व विनियमनानुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
तसेच जे अन्न व्यावसाईक दररोज 50 लिटर किंवा त्यापेक्षा जास्त तेलाचा वापर खादयपदार्थ तळण्यासाठी करीत असतील तर त्यांना सदर साठयाबाबत नोंद ठेवणे बंधनकारक आहे व असा खादयतेलाचा साठा अन्न सुरक्षा मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी मान्यता दिलेल्या बायोडिझेल उत्पादक कंपनी किंवा त्यांचे स्थानिक प्रतिनिधी यांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे सहाय्य्क आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.