<
जळगांव शहराला लाभली आहे खराब रस्त्यांची “देणगी”?
जळगांव(प्रतिनिधी)- एकीकडे प्रशासन खड्डे बुजविण्याचा दावा करत असले तरी शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट असल्याचं चित्र आहे. जळगावातील रस्त्यांची एवढी वाईट परिस्थिती आहे की यामुळे फक्त जीव घ्यायचा तेवढा बाकी आहे. मणक्यांचे असह्य दुखणे निर्माण झाले आहे व असह्य अशा वेदना होतात. असे शहरातील जेष्ठ नागरिक व तरुणांचे म्हणणे आहे. शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे कुणाचा जीव जात आहे तर अनेकांना वेगवेगळ्या आजारांचा ‘सामना’ करावा लागत आहे. जळगावातील खड्डे तर आरोग्याचे वैरी बनलेले आहेत. शहरातील खड्डय़ांमुळे होणारा वाहतुकीचा खोळंबा, त्यातून निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न याची जबाबदारी नेमकी कोणाची या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी मौन पाळले असले, तरी खड्यांमूळे आरोग्य संकटात येत आहे. शहरातील रस्ते हे अपघाताचे सापळे ठरत असून दुचाकी वाहने तसेच चार चाकी वाहने चालविण्याऱ्यांना पाठीच्या, पायाच्या तसेच सांध्यांच्या विकाराचा सामना करावा लागत आहे. या खड्डय़ांमुळे अनेकांना मणके तसेच सांधेदुखीच नव्हे, तर हृदयविकाराचा त्रासही उद्भवू शकतो. गर्भवती महिलांना रुग्णालयात जाताना होणाऱ्या त्रासाची कल्पना तरी या लोकप्रतिनिधींना आहे का? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. शहरातील सर्व रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून त्यामुळे पाठीच्या आजारांनी त्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरातील रस्ते हे आजपर्यंत कधी नव्हे इतके खराब झाले आहेत. ठिकठिकाणी पडलेले मोठ-मोठे खड्डे, त्यातून कसरत करीत वाहने चालवावी लागत असून दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. जळगांव आज खड्ड्यांचे शहर म्हणून खराब रस्त्यामुळे प्रसिद्ध होत आहे. तसेच खड्यांचे “माहेरघर” म्हणून जळगांव शहराची एक वेगळी ओळख निर्माण होत आहे. शहरातील रस्ते खराब असल्याची ओरड एवढी की, या प्रश्नाकडे कानाडोळा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्याची सवयच झाली आहे! जळगांव शहराच्या रस्त्यांसाठी नाना प्रकारची आंदोलने झाली. पण लोकप्रतिनिधी मात्र ढिम्मच. शहरातील या खराब रस्त्यांमुळे हाडे अक्षरश: खिळखिळी झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मानदुखी, पाठदुखी, खांदे दुखीसह इतर दुखणे कायमचे मागे लागेल अशी भीती शहरातील नागरिकांमध्ये आहे. शहरातील खराब रस्त्यांविरोधात काही सजग नागरिकांनी आंदोलन ही सुरू केले. तरीही लोकप्रतिनिधींनी रस्त्यांवरील खड्डय़ांचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. काही ठिकाणी माती टाकून खड्डे बुजविण्याचे थातूर-मातूर उद्योग वगळल्यास रस्त्यासाठी फार काही घडले नाही. तसेच शहरातील शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडल्याने शाळकरी विद्यार्थी आणि पालकांना चालतांना त्रास होत आहे. शहरातील या खराब रस्त्यांमुळे शाळकरी लहान मुलांना आता पासूनच आपल्या दुखण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींनी काही पत्रकारांना शहरातील खड्यांसंदर्भात मुलाखती दिल्या असता, लोकप्रतिनिधी म्हणाले की शहरातील खड्डे हे “अमृत जल योजना” यामुळे बनले आहे. तर अमृत जल योजनेचे काम सुरू होण्यापूर्वी शहरात खड्डे नव्हते का? असा प्रश्न सुजान नागरिक व्यक्त करत आहेत. शहरातील खड्यांमूळे नागरिकांमध्ये प्रचंड मनस्ताप असून येणाऱ्या निवडणुकीत ते हा राग योग्य लोकप्रतिनिधी ला मतदान करुन व्यक्त करणार आहे. असे नागरिकांनी बोलून दाखविले.