<
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘व्हिंटर स्कूल’ चा समारोप; जगभरातील अभ्यासकांचा सूर
जळगाव-(प्रतिनिधी) – जगभरात सध्या ताण-तणाव, धर्म-समाजांमध्ये मतभेद, आर्थिक विषमता, पर्यावरणीय हिंसा वाढत आहे. जगातील हिंसा, मतभेद दुर करून शांतता नांदण्यासाठी महात्मा गांधीजींच्या विचारांचे कृतिशील आचरण प्रत्येकाला करावे लागेल. विश्व शांतीचा मार्ग गांधी विचारांमध्ये आहे; असा सूर गांधी रिसर्च फाउंडेशनच्या ‘व्हिंटर स्कूल’ या चर्चासत्रात उमटला.
गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे बा-बापू 150 जयंती वर्षानिमित्त ‘व्हिंटर स्कूल’ (हिवाळी शाळा) अंतर्गत ‘गांधीजींची अहिंसा आणि शांती’ या विषयावर सहा दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. 6 जानेवारीपासून सुरू असलेल्या या स्कूलचा आज समारोप झाला. याप्रसंगी गांधी रिसर्च फाउंडेशनचे ज्येष्ठ विश्वस्त दलिचंदजी ओसवाल, अंबिका जैन, जगदीश रतनानी, प्रो. डॉ. गीता धरमपाल, तानिया राव उपस्थित होते. अहिंसा, परस्पर सहकार्य, प्रेम भावनेतून शांती निर्माण करण्यासाठी महात्मा गांधीजींच्या विचारांवर चालण्याचा सहभागी सदस्यांनी संकल्प केला. केनिया, जर्मन, यू. एस., न्युझीलंड, येमन सह भारतातील 17 जणांनी या स्कूलच्या चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला. डॉ. सुदर्शन अय्यंगार, प्रो. मथाई, जगदीश रातनानी, प्रो.डॉ.गीता धरमपाल, डॉ. जॉन चेल्लादूराई यांनी विविध विषयांन्वये गांधीजींचे विचार प्रस्तूत केलेत. महात्मा गांधीजींच्या सत्याग्रह आणि रचनात्मक कार्यपद्धतीतून सर्वोदय समाजाची निर्मिती होऊ शकते. यासाठी सत्य, अहिंसेसह गांधीजींनी विकेंद्रीत केलेल्या पद्धतीचा मध्यम मार्गाचा प्रत्येकाने अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले.
व्हिंटर स्कूलच्या समारोपाप्रसंगी दलिचंदजी जैन यांनी गांधी रिसर्च फाउंडेशनच्या निर्मिती मागील उद्देश सांगितला. जैन परिवार व भवरलालजी जैन यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा संस्कार असल्याने ग्रामीण विकासात भवरलाल जैन यांचे योगदान मोठे आहे. त्यांचे कार्य प्रत्येकाला ऊर्जा देतात असे दलिचंद जैन म्हणाले. भावनिक मुद्द्यावरून महात्मा गांधी समजून घेताना त्यांच्या विचारांशी एकरूप होता येते. या विचारामध्ये जागतिक शांतीचा मार्ग असल्याचे गीता धरमपाल यावेळी म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते सहभागींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.