हिरकणी कक्ष फक्त एक शोपीस: शध्यांकाळ नंतर कक्षात अंधार
जळगाव – (चेतन निंबोळकर) – बालकांच्या विकासासाठी सुरवातीच्या काही दिवसांमध्ये बाळाला स्तनपान देणे गरजेचे असते. मात्र, सार्वजनिक ठिकाणी मातांना बाळाला स्तनपान देता यावे, यासाठी शासनाने काही सरकारी योजना सुरू केल्या आहेत. यात महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या हिरकणी कक्षाचाही समावेश आहे. स्तनदा मातांना आपल्या लहान मुलांना स्तनपान करण्यासाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या प्रत्येक आगारात हिरकणी कक्षाची स्थापना केली आहे. मात्र, हे कक्ष मातांना स्तनपान करण्यास योग्य राहिले नाहीत. अशीच परिस्थिती जळगांव बस स्थानकावर पाहायला मिळत आहे. येथे असलेला हा हिरकणी कक्ष मात्र केवळ नावालाच उरला आहे. या कक्षात कसल्याच सुविधा नसल्याने त्याचा वापर फिरस्ते, भिकारी व स्थानकातील भंगार ठेवण्यासाठी होत आहे. कक्षाच्या दुरवस्थेमुळे स्तनदा अशा वेळी महिलांना आपल्या बाळासह बस स्थानकात बसून बससाठी प्रतीक्षा करावी लागते. अशावेळी गर्दी असलेल्या बस स्थानकात बाळांना असे उघड्यावर दूध पाजतांना महिलांची कुचंबणा होते. जळगांव बस स्थानकावरील हिरकणी कक्षाची दुरवस्था झाली असून यात महिलांना बसण्यासाठी जागा नाही तसेच लाइट, पंखा यांची सोय नसून याचा लाभ घेण्याजोगा नसल्याने हा हिरकणी कक्ष फक्त एक शोपीस म्हणून आहे. या दयनीय अवस्थेमुळे महिला प्रवाशांना काहीही उपयोग होत नाही. या हिरकणी कक्षामध्ये प्रचंड अस्वच्छता असून, दुर्गंधी पसरली आहे. कक्षाची एकदाही स्वच्छता केलेली दिसून येत नाही. तसेच कक्षाच्या भिंती या पान, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या आहेत. तसेच या कक्षात धूळ ही मोठ्या प्रमाणात बसली असून या कक्षाचा संपूर्णत: बोजवारा उडाला आहे. अशा परिस्थितीत महिला या कक्षात येण्यास धजावत नाहीत.
जळगांव बस स्थानकावरून नांदेड, बीड, लातूर, नाशिक, शिर्डी, शेगांव, नगर, सोलापूर, उस्मानाबाद, मुंबई, पुणे, सातारा या महत्त्वाच्या शहरांना बस जातात, या स्थानकात प्रवाशांची संख्या त्यातही महिलांची संख्या जास्त असते. येथे हिरकणी कक्ष स्थापन झाल्यापासून हा कक्ष अवघे काही दिवसच सुस्थितीत होता. परंतु, आता या कक्षाची दुरवस्था झाली आहे. या कक्षाचा वापर महिलांऐवजी फिरस्ते व भिकारी करीत आहेत. दुरवस्थेमुळे महिलांना या कक्षाचा वापर करता येत नाही.
सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी
दरम्यान, हा कक्ष केवळ नावालाच राहिला असल्याने महिलांची गैरसोय होत आहे. या कक्षाची दुरुस्ती करून सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महिलांमधून होत आहे. जेणेकरून महिलांना त्याचा वापर करता येईल आणि त्यांची गैरसोय टळेल.