<
‘कौटुंबिक व्यवसाय व्यवस्थापन’ याचे उपघटक, अभ्यासाची पद्धत आणि उपयुक्तता यांविषयी मिळणार सविस्तर माहिती
जळगाव-अनेक मोठय़ा उद्योगांची-व्यवसायांची सुरुवात ही कौटुंबिक उद्योगापासूनच होते. आपल्या देशामध्ये अशी अनेक उदाहरणे आपल्या अवतीभोवती दिसतात. आज कौटुंबिक स्तरावर चालवले जाणारे अनेक व्यवसाय आपल्याला दिसतात. या व्यवसायांचे स्वरूप सुरुवातीच्या काळामध्ये अर्थातच लहानसे असते; परंतु एखाद्या लहान व्यवसायाचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापन कार्यक्षम असायला हवे. कोणताही व्यवसाय हा दीर्घ काळामध्ये लहान राहणार नाही, तो वाढणारच. या वाढीबरोबर उद्योग-व्यवसायाला लागणारी कार्यक्षमता तसेच दूरदृष्टी, बाजारपेठेची माहिती, भांडवल उभारणीसंबंधीची माहिती या सर्व गोष्टी नसतील तर व्यवसायाची वाढ खुंटते आणि असा व्यवसाय कालांतराने बंदसुद्धा पडण्याची शक्यता असते. यामुळेच प्रशिक्षित व्यवस्थापकांची गरज अशा प्रकारच्या कौटुंबिक स्तरावरील व्यवसायांनासुद्धा आहे. हे व्यवसाय जर वाढले तर त्यातून रोजगारनिर्मिती होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागू शकतो. त्यामुळे या कौटुंबिक व्यवसायाचे नेमके स्वरूप काय आहे याची सखोल माहिती ता. ६ फेब्रुवारी गुरुवार रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात “फॅमिली बिजनेस समिट” या कार्यक्रमात एस. पी. जैन मुंबई येथील व्यवस्थापनशास्त्राचे मार्गदर्शक सुपरिचित प्राध्यापक समिश दलाल हे उपस्थित विध्यार्थी व नागरिकांना देणार आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून शहरातील नागरिकांनीही याचा लाभ घ्यावा असे आवाहन जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले आहे.