<
दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं
शोधून कधी सापडत नाही, मागुन कधी मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा, टाळू म्हणून टळत नाही
आकाश पाणी तारे वारे, सारे सारे ताजे होतात
वर्षाच्या विटलेल्या मनाला, आवेगांचे तुरे फुटतात
संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन, किती किती तऱ्हा असतात
साऱ्या सारख्याच जीवघेण्या, आणि खोल जिव्हारी ठसतात
प्रेमाच्या सफल-विफलतेला, खरंतर काही महत्त्व नसतं
इथल्या जय-पराजयात, एकच गहिरं सार्थक असतं
मात्र ते भोगण्यासाठी, एक उसळणारं मन लागतं
खुल्या सोनेरी ऊन्हासारखं, आयुष्यात प्रेम यावं लागतं….
आपल्या लेखणीतून मराठी गाण्यांना अजरामर करणारे रससंपन्न भावकवी सुधीर मोघे यांची 8 फेब्रुवारी जयंती. गीतकार म्हणून मोघे यांची गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. फिटे अंधाराचे जाळे, आला आला वारा, एकाच या जन्मी जणू, विसरू नका श्रीरामा मला, गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’, यासारखी अवीट गोडी असणारी गीते मोघे यांनी लिहिली. लोकांना भावणारी गीते मोघे यांनी लिहिली. ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे ते बंधू होत. मूळचे कवी असलेल्या सुधीर मोघे यांनी गीत लेखन, संगीत दिग्दर्शन, ललित लेखन, पटकथा व संवाद लेखन अशा अनेक प्रांतात आपला स्वतंत्र ठसा उमटवला होता. जानकी, पुढचं पाऊल, शापित, हा खेळ सावल्यांचा, कळत-नकळत, चौकट राजा, आत्मविश्वास, एक डाव भुताचा, लपंडाव, सूर्योदय, अशा 50हून अधिक सिनेमांसाठी त्यांनी गीत लेखन केले.
सांज ये गोकुळी, फिटे अंधाराचे जाळे, दिसलिस तू, फुलले ऋतु, आदिमाया अंबाबाई, मन मनास उमगत नाही, मना तुझे मनोगत, झुलतो बाई रास-झुला, दयाघना, एकाच या जन्मी जणू…’ अशी त्यांची अनेक गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.
शांता शेळके, सुधीर फडके यांच्यासोबतची त्यांची गाणी विशेष गाजली. कविता-गीतलेखनाचं काम करत असतानाचा त्यांनी काही मालिका, सिनेमांनाही संगीतकार म्हणून साज चढवला. कशासाठी प्रेमासाठी
या सिनेमाला त्यांनी संगीत दिलं होतं तर झी मराठीवर गाजलेला नक्षत्रांचे देणे
या कार्यक्रमाची एक वेगळी संकल्पना घेऊन त्यांनी या कार्यक्रमाचं सादरीकरणही तितक्याच दिमाखदारपणे केलं होतं. मंतरलेल्या चैत्रबनात’ असो किंवा
स्मरणयात्रा` असे नेहमीच वेगळे प्रयोग करण्यात त्यांचा हातखंडा होता. साहित्य व संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार त्यांनी तब्बल चारवेळा पटकावला होता. अखेरच्या काळात सुधीर मोघे यांनी भावसंगीताचा इतिहास लिहिण्याचे काम हाती घेतले होते. तसेच ‘सती’ नाटकावर आधारित ‘विमुक्ता’ हा चित्रपट सुरू करण्याच्या तयारीत होते. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि रवींद्र मंकणी यांची भूमिका असलेल्या ‘रमा-माधव’ या चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिली असून काही प्रसंगांसाठी संवादलेखन केले आहे.
मोघे यांना मिळालेले पुरस्कार – राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार (चारवेळा), गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रबन पुरस्कार, मराठी कामगार साहित्य परिषदेचा गदिमा पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा शांता शेळके पुरस्कार, दांडेकर कुटुबिंयांचा गो. नि. दांडेकर स्मृती पुरस्कार, दामले कुटुंबीयांचा केशवसुत स्मृती काव्य पुरस्कार, सोमण परिवाराचा स्वरशब्दप्रभू अजित सोमण पुरस्कार..
– योगेश शुक्ल (९६५७७०१७९२)