<
महल, पाकिजा आणि रजिया सुल्तान यासारखे भव्य व कलात्मक चित्रपटांची रचना करणारे निर्माता दिग्दर्शक कमाल अमरोही यांचा आज स्मृतिदिवस. एक संवेदनशील गीतकार, उर्दू शब्दसामर्थ्याने नटलेले पटकथा आणि संवाद लेखक, निर्माता दिग्दर्शक या रुपांनी कमाल अमरोही यांनी चंदेरी हिंदी चित्रपटसृष्टीवर आपली अमीट अशी छाप सोडली आहे. भारतीय सिनेमाला एक वेगळी दिशा देणारे हे चित्रपट होते.
कमाल अमरोही यांचे मूळ नाव सैय्यद अमीर हैदर असे होते. 17 जानेवारी 1918 ला उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील जमीनदार परिवारात जन्मलेले सैय्यद आपल्या व्रात्य स्वभावाने गावात प्रसिध्द होते. संपूर्ण गावाला या जमीनदाराच्या मुलाचा त्रास होत असे. एकदा अम्मीने रागावल्यानंतर त्यांनी अम्मीला सांगितले की, मी एक दिवशी खूप प्रसिध्दी मिळवेल त्यादिवशी तुझी झोळी चांदीच्या नाण्यांनी भरेल. मात्र गावातल्या लोकांना त्रास दिल्याबद्दल मोठ्या भावाने थप्पड मारली आणि कमाल अमरोही रागावून घरातून पळून लाहौरला गेले.
लाहौर शहर त्यांचे जीवन बदलण्यासाठी कारणीभूत ठरले. तिथे त्यांनी प्राच्य भाषांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. वयाच्या 18 व्या वर्षीच तिथल्या एका उर्दू वर्तमानपत्रात नियमित स्तंभलेखन करण्यासाठी नोकरी सुरु केली. लवकरच त्यांची लेखनाची प्रतिभा पाहून संपादकांनी त्याचा पगार 300 रुपये केला. त्याकाळात 300 रुपये ही खूप मोठी रक्कम होती. वर्तमानपत्रात काम करीत असताना त्यांची भेट प्रसिध्द गायक अभिनेता कुंदनलाल सहगल यांच्याशी झाली. त्यांची लिखाणातील गती पाहून कुंदनलाल यांनी त्यांना चित्रपटसृष्टीत येण्याची ऑफर दिली. त्यानुसार कमाल प्रथम कलकत्ता येथे आणि नंतर मुंबईला पोहोचले. कुंदनलाल सहगल यांनी मिनर्व्हा मुव्हीटोनचे निर्माता दिग्दर्शक सोहराब मोदी यांच्याशी भेट घालून दिली. मिनर्व्हाला काम करीत असताना निर्माता दिग्दर्शक कथाकार ख्वाजा अहमद अब्बास यांचा प्रभाव कमाल अमरोही यांच्यावर पडला.
कमाल अमरोही यांनी तीन लग्न केली होती. पहिली पत्नी बानो ही नर्गिस यांची आई जद्दनबाई यांची नोकर होती. मात्र लग्नानंतर अल्पावधीतच बानो यांचे दम्याने निधन झाले. त्यानंतर कमाल यांनी महमूदी यांच्याशी निकाह केला. कमाल अमरोही यांनी तिसरे लग्न प्रसिध्द अभिनेत्री ट्रॅजिडी क्वीन मीनाकुमारी यांच्याशी केले. लग्नसमयी मीनाकुमारी त्यांच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान होती. त्यावेळी कमाल यांचे वय 34 वर्षे तर मीनाकुमारी यांचे वय 19 वर्षे होते. 1952 मध्ये झालेला हा विवाह जास्त दिवस टिकला नाही. मात्र मीनाकुमारीवर असलेले कमाल यांचे प्रेम जीवनाच्या अखेरपर्यंत होते. म्हणूनच त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना मीनाकुमारीच्या कब्रच्या बाजूलाच दफन करण्यात आले.
सोहराब मोदी यांच्याकडे काम करीत असताना त्यांना चित्रपटासाठी नवीन गोष्टीचा शोध असल्याचे समजल्याने कमाल त्यांच्याकडे एक गोष्ट घेवून गेले. त्यावर आधारीत असलेला पुकार (1939) हा चित्रपट सुपरहिट झाला. नसीम बानो आणि चंद्रमोहन यांनी अभिनय केलेल्या चित्रपटाचे कथानक कमाल अमरोही यांचे तर ‘धोया महोबे घाट हे हो धोबिया रे, दिल मे तू आँखो में तू मेनका, गीत सुन वाह गीत सैंया, काहे को मोहे छेडे रे बेईमनवा’ ही चार गीते कमाल यांनी लिहीली. यानंतर मात्र त्यांच्याकडे कथा, पटकथा आणि संवाद लिहिण्याच्या कामाचा ओघ सुरु झाला. त्यांनी जेलर (1939), मैं हारी (1940), भरौसा (1940), मजाक (1943), फूल (1945), शाहजहां (1946), महल (1949), दायरा (1953), दिल अपना और प्रीत पराई (1960), मुगले आजम (1960), पाकीजा (1971), शंकर हुसैन (1977), रजिया सुल्तान (1983) या चित्रपटांच्या कथा, पटकथा व संवाद लिहिले. कमाल यांनी निवडक चित्रपटांकरिता काम केले. त्यामुळे त्यांना विचार करण्यास भरपूर वेळ मिळत असे. याचमुळे त्यांच्या चित्रपटनिर्मितीची गती कमी होती. याबद्दल अनेकदा त्यांना टीकेला सामोरेही जावे लागले.
निर्माता अशोक कुमार यांचा महल या चित्रपट कमाल यांच्या जीवनाला सुवर्णस्पर्श करणारा ठरला. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिण्यासोबतच त्यांना दिग्दर्शनाची संधी देण्यात आली. चित्रपटसृष्टीतील गीत आणि संगीताने नटलेला पहिलाच रहस्यमय चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत रहस्य व भयपटांची निर्मिती सुरु झाली. या चित्रपटाने केवळ कमाल यांना दिग्दर्शक म्हणून नाव मिळाले नाही तर अभिनेत्री मधुबाला आणि गायिका लता मंगेशकर यांनाही चित्रपटसृष्टीची दारे उघडली गेलीत. महल चित्रपटाच्या यशानंतर कमाल यांनी ‘कमाल पिक्चर्स’ या निर्मिती संस्थेची व 1958 मध्ये कमालिस्तान स्टुडिओची स्थापना केली. कमाल पिक्चर्स या बॅनरखाली त्यांनी आपली तिसरी पत्नी मीनाकुमारी यांना घेवून दायरा या चित्रपटाची निर्मिती केली. कलात्मक चित्रपटांमध्ये मानाचे स्थान असलेला हा चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला. याचदरम्यान निर्माता दिग्दर्शक के.आसिफ आपल्या महत्वाकांक्षी चित्रपट मुगल ए आझम वर काम करत होते. या चित्रपटाचे संवादलेखनाचे काम वजाहत मिर्झा यांच्याकडे होते. मात्र त्यांचे संवाद वाचल्यानंतर के.आसिफ यांचे समाधान होत नव्हते. या महान चित्रपटातील संवाद वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या डोक्यात राहिले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. याकरिता त्यांनी संवादलेखनाचे कार्य कमाल अमरोही यांना सोपावले. कमाल यांनी उर्दूत लिहिलेले या चित्रपटाचे संवाद इतके प्रसिध्द झाले की त्याकाळात आपले प्रेम व्यक्त करण्याकरिता प्रेमीयुगुल या चित्रपटातील संवाद वापरत असत. या चित्रपटाकरिता सर्वश्रेष्ठ संवादलेखनाचे फिल्मफेअर कमाल यांना मिळाले.
पाकीजा हा कमाल अमरोही यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. 1958 मध्येच त्यांनी यावर काम करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला कृष्णधवल चित्रीकरण सुरु झाले मात्र काहीच दिवसात भारतात सिनेमास्कोप चित्रपटांचे निर्माण सुरु झाल्याने 1961 मध्ये पुन्हा या चित्रपटाचे सिनेमास्कोप स्वरुपात चित्रीकरण सुरु झाले. मात्र याचदरम्यान कमाल अमरोही आणि मीनाकुमारी यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. त्यामुळे 1961 ला चित्रपटाची निर्मिती बंद झाली. मात्र 1969 मध्ये कमाल यांनी या चित्रपटात काम करण्याविषयी मीनाकुमारी यांचे मन वळविले आणि अखेरीस 1971 मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले. फेब्रुवारी 1972 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत इतिहास घडवला. प्रभावी संवाद, कर्णमधूर गीत संगीत, मनमोहक चित्रीकरण आणि कलावंतांचा अभिनय यामुळे यशस्वी झालेला हा चित्रपट आजही क्लासिक चित्रपटांच्या यादीत वरच्या स्थानावर आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कमाल यांनी ‘मौसम है आशिकाना’ या गाण्याचा चित्रपटात समावेश केला. या गाण्यासाठी प्रेक्षकांनी पुन्हा एकदा हा चित्रपट पाहिला. यानंतर मात्र कमाल अमरोही हे चित्रपटसृष्टीपासून दूर गेलेत. 1983 मध्ये त्यांनी रजिया सुल्तान या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा यशस्वी पुनरागमन केले. आपल्या शब्दसामर्थ्य आणि दिग्दर्शन व चित्रीकरणाच्या जादूने प्रेक्षकांना मोहित करणार्या या व्यक्तिमत्वाने 11 फेब्रुवारी 1993 ला या दुनियेला अलविदा म्हटले.
– योगेश शुक्ल (९६५७७०१७९२)