<
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी कृषिमंत्री शरदरावजी पवार यांची प्रमुख उपस्थिती
जळगाव येथील ‘आकाश’ जैन हिल्स येथे समारंभ
जळगाव-(प्रतिनिधी) – अखिल भारतीय पातळीवर कृषी क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून लौकिक प्राप्त केलेल्या ‘पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार’ वितरण सोहळा शनिवार15 फेब्रुवारी 2020रोजी दुपारी 12.00 वाजता ‘आकाश’ जैन हिल्स जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील नंदापूर येथील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय भानुदासराव चव्हाण हे 2018 या वर्षाच्या पुरस्काराचे मानकरी आहेत. मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे, भारताचे माजी कृषिमंत्री मा. शरदरावजी पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठामंत्री ना. गुलाबराव पाटील, कृषिमंत्री मा. दादाजी भुसे, जळगाव जिल्ह्याचे सन्माननीय खासदार आणि आमदार आदी मान्यवर या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
भारतीय कृषिक्षेत्राला स्व. आप्पासाहेब पवार यांनी उच्च कृषितंत्रज्ञानाची दृष्टी देऊन कृषी शिक्षण विस्तारासाठी आपले आयुष्य वेचले. राज्याच्या कानाकोपर्यातील शेताच्या बांधाबांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांना उच्च तंत्रज्ञानाच्या उपयोगीतेबाबत जागरूक केले. त्यांच्या या प्रेरणादायी आणि प्रभावशाली कार्याला अभिवादन म्हणून त्यांच्या नावे हा पुरस्कार देण्यात येत असतो. या पुरस्कारास एक तपाहून अधिक वर्ष होत आहे. सन्मानचिन्ह, दोन लाख रुपये व सपत्नीक पुरस्कारार्थींचा सत्कार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ठिबक सिंचनासह आधुनिक कृषी उच्च-तंत्राचा वापर करून अनेकविध कृषी प्रयोगपद्धतीव्दारे बहुमोल योगदान व लक्षणीय उत्पादनार्थ ‘पद्मश्री डॉ. आप्पासाहेब आधुनिक कृषि उच्च-तंत्र पुरस्कार’ मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील नंदापूर येथील प्रगतशिल शेतकरी श्री. दत्तात्रय भानुदासराव चव्हाण यांची निवड पुरस्कार निवड समितीने केली आहे. या पुरस्कारार्थींच्या निष्पक्ष निवडीसाठी माजी कुलगुरू डॉ. एस.एस. मगर यांच्या अध्यक्षतेखाली कृषी शास्त्रज्ञांची निवड समिती असून या समितीमार्फत निवड केली जाते. या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनचे विश्वस्त सेवादास दलुभाऊ जैन, कविवर्य ना.धों. महानोर यांनी केले आहे.
पुरस्कारार्थी शेतकऱ्याचे कार्य व परिचय थोडक्यात
फळबाग आणि मिश्र शेती आणि आधुनिक कृषी उच्चतंत्राचा अवलंब करून सौभाग्यवतीचीही मदत घेत स्मार्ट शेती करणारे 43 वर्षीय प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय भानुदासराव चव्हाण हे 150 एकर शेती कसतात. त्यांनी फळबाग व भाजीपाला पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. पूर्णवेळ शेतीमध्ये ते काम करतात. त्यांचे 30 सदस्य असलेले कुटुंब आहे. वडिलोपार्जित 150 एकरात त्यात त्यांनी सीताफळ, द्राक्षे, डाळिंब, पपई, तूर, मका, ज्वारी, भाजीपाला या पिकांची लागवड केलेली आहे. त्यांच्याकडे 6 आणि 4 कोटी लिटर्स पाण्याची क्षमता असलेले 2 शेततळे असे पाण्याचे स्त्रोत आहे. सिंचनासाठी 11 विहिरी आणि सौर ऊर्जेवर चालणारे 5 अश्वशक्तीचे 4 पंप, विजेवर चालणारे 7 पंप आहेत. त्यांचा यांत्रिकीकरणासह केल्या जाणाऱ्या शेतीवर भर आहे. त्यासाठी ट्रॅक्टर, ब्लोअर, एचटीपी पंप, पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, ट्रॉली, मालवाहू पिकअप व्हॅन वगैरे आहेत. शेतीमध्ये सेंद्रीय बाबीचा समावेश व्हावा यासाठी त्यांनी गोवंश संगोपन देखील केलेले आहे. त्यांना द्राक्ष फळ प्रदर्शन पुरस्कार (2006), वसंतराव नाईक स्मृती पुरस्कार (2007), आयडीयल फार्मर पुरस्कार (2016) आणि अलीकडेच भारतीय अनुसंधान परिषद पुण्याचा द्राक्ष गौरवचिन्ह देऊन त्यांचा सन्मान यापूर्वी झालेला आहे.
पुरस्काराचे वैशिष्ट्य आणि यापूर्वी दिलेले पुरस्कार-
2002 पासून हा पुरस्कार देण्यास आरंभ झाला. महाराष्ट्राच्या विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र अशा पाच महसूल विभागातील एका शेतकऱ्याची या पुरस्कारासाठी निवड होते. हा व्दैवार्षिक पुरस्कार असून स्व. आप्पासाहेब पवार यांच्या कृषी क्षेत्रातल्या असामान्य कामगिरीला अभिवादन म्हणून या पुरस्काराची स्थापना जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी केली आहे.
आतापर्यंत विश्वासराव कचरे, तेलंगवाडी जि. सोलापूर (2002), प्रभाकर मानकर, अकोट जि. अकोला (2004), विश्वासराव पाटील, लोहारा जि. जळगाव (2006), भगवानराव क्षीरसागर , कडवंची जि. जालना (2008), सौ. मनिषा कुंजीर वाघापूर ता. पुरंदर जि. पुणे, (2010), डॉ. अनिल विठ्ठल जोशी मु. पो. नरवण जि. रत्नागिरी (2012), श्री. विजय इंगळे, मु. चितलवाडी, जि. अकोला (2014), श्री. अविनाश पाटोळे वडनेरभैरव जि. नाशिक (2016) या आठ शेतकऱ्यांचा यापूर्वी या पुरस्काराने सन्मान झालेला आहे.