<
तरुणांच्या आशा, अपेक्षांच्या पूर्ततेसाठी जातपंचायत आडवी येणार नाही हा आशावाद तरुणांच्या मनात निर्माण करण्याची आवश्यकता- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील
जळगाव-(प्रतिनिधी)-ज्या तरुणांच्या पिढीवर अवलंबून राहून आपण महासत्ता होण्याची स्वप्न बघत आहोत, त्या तरुणांची प्रतिनिधी मानसी बागडे हिला जर आत्महत्या करावी लागत असेल तर महासत्तेची स्वप्न बघण्याचा आपल्याला अधिकार आहे काय ? तरुणांच्या आशा, अपेक्षांच्या पूर्ततेसाठी जातपंचायत आडवी येणार नाही हा आशावाद तरुणांच्या मनात निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जळगांव जिल्हा महिला असोसिएशन यांच्या पुढाकाराने आणि समविचारी संघटना-संस्था यांच्या सहभागाने जातपंचायतीला मुठमाती राज्यस्तरीय संकल्प परिषदेचे रविवारी १ मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश पाटील होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून आ. राजूमामा भोळे यांच्यासह जातपंचायतीला मूठमाती अभियान विभागाचे राज्य प्रमुख कृष्णा चांदगुडे, राज्य सरचिटणीस डॉ.ठकसेन गोराणे, बानोताई बागडे, राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे, जिल्हा महिला असोसिएशन अध्यक्षा राजकुमारी बालदी उपस्थित होते.
सुरुवातीला डॉ.नरेंद्र दाभोलकरांना अभिवादन करणारे गीत कार्यकर्त्यांनी सादर केले. शहरात २३ जानेवारी रोजी कंजरभाट समाजातील मानसी बागडे या तरुणीने जातपंचायतीच्या मनमानीला कंटाळून आत्महत्या केली होती. या परिषदेचे उद्घाटन मानसीची आई बानोताई यांच्या हस्ते जातपंचायतीच्या बेड्या तोडून अनोख्या पद्धतीने करण्यात आले. कौमार्य चाचणी, बालविवाह, शोषक जातपंचायत अशांच्या बंधनातून तरुणीला मुक्त करून हे उद्घाटन झाले. प्रास्ताविकात कृष्णा चांदगुडे यांनी, राज्यात जातपंचायतींचे अस्तित्व दिसून आल्यानंतर त्यांच्या शोषक बाबींविरुद्ध अंनिसने आवाज उठविला असे सांगत परिषद घेण्यामागील भूमिका विशद केली.
आ.राजूमामा भोळे म्हणाले की, भारतीय संविधानानुसार आम्ही काम करतो. संविधानाचे पालन सर्वांनी केले पाहिजे. जीवनात श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. संत, समाजसुधारकांनी केलेले विचारपरिवर्तनाचे काम पुढे गेले पाहिजे. आरोग्य आणि शिक्षणाची व्यवस्था चांगली निर्माण झाली पाहिजे. मी अंधश्रद्धा मानत नाही, माझा अंनिसच्या कामाला पाठींबा आहे. प्रत्येक समाजात चुकीच्या रूढी, प्रथा असतील तर दूर झाल्या पाहिजेत, असेही आ. राजूमामा भोळे म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात अविनाश पाटील यांनी, जातपंचायतींच्या जाचांना सामाजिक पातळीवर सामुहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. याविषयी शासन प्रचंड उदासीन आहे. जातपंचायतींनी पिडीत व्यक्तींना आधार देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येणे महत्वाचे आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांना योग्य प्रशिक्षण नसल्यानेच जातपंचायती फोफावल्या आहेत, असे सांगितले. महाराष्ट्राचे समाजमन हे जातपंचायतीच्या विरोधात आहे. जातपंचायतीच्या जाचाला कंटाळून कुठलाही तरुण, कुठलेही कुटुंब जर बाधित असेल अशा लोकांच्या पाठीशी अंनिस कायम उभी आहे, असेही अविनाश पाटील म्हणाले. सूत्रसंचालन राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी मानले. आभार भारती पाथरकर यांनी केले.
प्रथम सत्र
परिषदेच्या पहिल्या सत्रात जातपंचायत पिडीत व्यक्तींनी अनुभव कथन केले. सत्राच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील शासकीय वितीय सल्लागार कृष्णा इंद्रेकर होते. सत्रात नाशिक येथील कोमल वर्दे,अरुणा कुंभारकर, अण्णा हिंगमिरे, तनुजा मोती, मुंबई येथील लीला इंद्रेकर, औरंगाबाद येथील दर्शनसिंग मलके हे सहभागी झाले होते. जातपंचायतींनी कसा त्रास दिला, वाळीत टाकल्यावर अनुभव आले अशा प्रकारे पिडीतांनी आपबिती कथन केली. यात कोमल वर्दे यांनी पती वारल्यावर पत्नीला अंधार खोलीत कोंडण्याच्या प्रथेला विरोध केला असे सांगितले तर तनुजा मोती यांनी कंजरभाट समाजातील जाचक रूढी प्रथा यांना विरोध केला पाहिजे असे सांगितले.
अरुणा कुंभारकर यांच्या मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून पित्याने गळा घोटला होता त्यामुळे हळव्या झाल्या होत्या. परिषदेत त्यांना रडू कोसळले. त्यांच्यावतीने कृष्णा चांदगुडे यांनी माहिती दिली. अण्णा हिंगमिरे यांनी भटक्या जोशी समाजाने बहिष्कृत केल्याची आपबिती सांगितली तर लीला इंद्रीकर यांनी कंजरभाट समाजातील तरुणांच्या पाठीशी पालकांनी खंबीरपणे उभे राहावे असे सांगितले. दर्शनसिंग भालके म्हणाले, कंजरभाट समाजाने मला सहा वर्षे समाजाबाहेर काढल्याचे म्हटले. कंजरभाट जातपंचायतीचे प्रतिनिधी हसन मलके यांनीही त्यांचे अनुभव सांगितले. सत्र अध्यक्ष कृष्णा इंद्रेकर म्हणाले की, आणखी किती मानसिंच्या आत्महत्या होणे आपल्याला अपेक्षित आहे ? आपण २१ व्या शतकात आज जातपंचायतींना मूठमाती दिलीच पाहिजे. विशीतील तरुणांचा वेश्या व्यवसाय सुरु झाला आहे. कंजरभाट समाजात अमानुषपणे जातपंचायतीनचा कारभार सुरु आहे. संविधान प्रचलित कायदेव्यवस्था झुगारून कंजरभाट समाजात बेभानपणे अत्याचार सुरु आहेत. प्रशासनाने यात लक्ष घालून प्रबोधन केले पाहिजे. कंजरभाट समाजातील जात पंचांनी आता समाजाचे शोषण करणे थांबवले पाहिजे. कंजरभाट समाजात डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक आहेत मात्र तरीही कौमार्य चाचणी सुरु आहे, हे कधी थांबेल ? असाही सवाल इंद्रेकर यांनी विचारला. सूत्रसंचालन सुनील वाघमोडे यांनी तर आभार प्रा.डी.एस.कट्यारे यांनी मानले.
द्वितीय सत्र
द्वितीय सत्रात “जातपंचायतीच्या अन्यायग्रस्त परिस्थितीला जबाबदार कोण ?” याविषयी मंथन करण्यात आले. सत्राच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या वासंती दिघे होत्या. तर सत्रात अॅड.तृप्ती पाटील (ठाणे), अॅड. विनोद बोरसे (धुळे), जिजा राठोड (पाचोरा) यांनी सहभाग घेतला. अॅड.तृप्ती पाटील यांनी जातपंचायतीच्या जाचामागे अज्ञान व पुरुषप्रधान व्यवस्था आहे असे सांगत कायदा राबविणाऱ्या यंत्रणेलाही प्रशिक्षणाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचे नियम आपण तयार करून शासनाला दिले आहेत, त्याला मान्यता मिळायला हवी असेही त्या म्हणाल्या. अॅड. विनोद बोरसे म्हणाले की, व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार असून जातपंचायत त्या हिरावून घेत आहेत. विधी सेवा प्राधिकरणाची मदत देखील घेतली गेली पाहिजे, असेही ते म्हणाले.
जिजा राठोड यांनी सांगितले की, कौमार्य चाचणी केवळ स्त्रियांचीच का घेतली जाते ? शिक्षणाचा अभाव हा भटक्या समाजाचा खरा प्रश्न आहे. अध्यक्षीय भाषणात वासंती दिघे यांनी, कोणतीही प्रथा जिवंत ठेवायची असेल तर समाजातील स्त्रियांवर बंधने लादली जातात. ती दूर झाली पाहिजे असे सांगितले. सूत्रसंचालन डॉ.ठकसेन गोराणे यांनी तर आभार शहर कार्याध्यक्ष जितेंद्र धनगर यांनी केले.
समारोप
समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी अॅड. मनीषा महाजन (पुणे) ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून अंनिसचे राज्य पदाधिकारी डॉ.प्रदीप जोशी, प्राचार्य डॉ.बी.एन.पाटील उपस्थित होते. यावेळी परिषदेचा आढावा राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी घेतला. प्रसंगी परिषदेत मंजूर पिंजारी, रणजीत शिंदे, काजल बागडे, कोमल गायकवाड, सागर बहिरुणे या ५ तरुणांच्या हस्ते ठराव वाचन करण्यात आले. डॉ. प्रदीप जोशी म्हणाले की, मानसिक दुर्बलता जाणवत असल्याने पिडीत लोक तक्रारी करीत नाही, त्यासाठी अंनिस मदत करायला तयार आहे. अध्यक्षीय भाषणात अॅड. मनीषा महाजन म्हणाल्या की, जातपंचायत कडे तर्क, तथ्य, कायदा नाही. त्या द्विधा मन:स्थितीत असतात. पिडीताना मानसिक आधार न मिळाल्याने त्या टोकाचे पाउल उचलतात, असेही अॅड. मनीषा महाजन म्हणाल्या. सूत्रसंचालन विश्वजीत चौधरी यांनी तर आभार जिल्हा प्रधान सचिव आर.वाय.चौधरी यांनी मानले.
परिषदेत मानसी बागडे यांचा परिवार उपस्थित होता. मंचाला “मानसी बागडे स्मृती विचारमंच” असे नाव देण्यात आले होते. परिषदेसाठी धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद, बुलढाणा, ठाणे तसेच जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. परिषदेसाठी अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव अशोक तायडे, डी.आर.कोतकर, डॉ.अय्युब पिंजारी, अरुण दामोदर, शहराध्यक्ष विकास निकम, मंजूर पिंजारी, सुधाकर पाटील, विजय लुल्हे, सुरेश थोरात, आर.एस.चौधरी, शिरीष चौधरी, कल्पना चौधरी, गुरुप्रसाद पाटील, अशफाक पिंजारी, दिलीप भारंबे, सायली चौधरी, गणेश पवार, प्रदीप पांडे, महिला असोसिएशनच्या मंगला नगरकर, ज्योत्स्ना ब-हाटे, डॉ.हेमलता रोकडे, बिंदिया नांदेडकर, छाया गडे, चंद्रकला परदेशी, स्मिता पाटील, मिनाक्षी वाणी, निर्मला जोशी, यास्मिन मेहंदी, आझमी मेहंदी, वैशाली पाटील, रत्ना झंवर आदींनी परिश्रम घेतले.
महाराष्ट्र अंनिस आणि जळगांव जिल्हा महिला असोसिएशन यांच्या
पुढाकाराने जळगांव येथे १ मार्च २०२० रोजी आयोजित जातपंचायतीला
मुठमाती राज्यस्तरीय संकल्प परिषदेतील ठराव
१. मानसी ऊर्फ मुस्कान बागडे या मृत तरुणीच्या भयग्रस्त परिवाराला भीतीच्या मानसिकतेतून
बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र अंनिस तर्फे मानसोपचार तज्ञांची मदत पुरविली जाईल. तसेच कंजारभाट समाजातील बांधवांशी संवाद करून या परिवाराला समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमात मानसन्मानाने सहभागी करून घेण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील.
२.कंजारभाट समाजातील नवविवाहित वधूची कौमार्य चाचणी कशी अशास्त्रीय आहे, तसेच ही अनिष्ट प्रथा जोपासल्याने समाजातील स्त्रियांना कसे कलंकित आणि मानहाणीकारक जीवन जगावे लागते, हेे सविस्तर स्पष्ट करून, इथून पुढे कंजरभाट समाजातील कोणत्याही नवविवाहितेची कौमार्य चाचणी होणार नाही, यासाठी समाजातील तरुण-तरुणींना संघटित करून, ही अनिष्ट प्रथा तत्काळ थांबवण्यासाठी, विशेषत: युवतींनी पुढाकार घेऊन
मोहीम चालवावी तसेच सर्व समविचारी संघटना व व्यक्ती यांनी कंजारभाट समाजाशी सतत सुसंवादी राहावे, यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समिती पुढाकार घेईल.
३. महाराष्ट्रातील कंजारभाट समाजातील किंवा इतर जाती, पोटजातीतील जात पंचायतसदस्य यांच्याशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने यापुढेही सतत सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्यांच्या समाजातील अनिष्ट, अघोरी रूढी, प्रथा, परंपराा थांबविणे व त्यांच्या समाजातील सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक प्रश्न सोडवण्यासाठी जात समुहांना संघटीत करण्याचा प्रयत्न यापुढे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून केले जातील. त्यासाठी जात पंचायतीला मुठमाती अभियान भविष्यात स्वतंत्रपणे संघटीत स्वरुपात कार्यरत होईल असा संकल्प आम्ही करीत आहोत..
४. “महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण (प्रतिबंध, बंदी व निवारण) अधिनियम, २०१६”, हा कायदा ३ जुलै, २०१७ पासून लागू झाला. परंतु त्याबाबतचे नियम होणे अजून बाकी आहे. ते तातडीने होणे आवश्यक आहे. त्यासाठीी महाराष्ट्र शासनाच्या न्याय व विधी विभागाकडे आणि आणि त्याच्याशी संबंधीत गृह व सामाजिक न्याय विभागाकडे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तातडीने पाठपुरावा करेल.
५. सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा झाल्यानंतर आवश्यक असणारे निरंतर समाज प्रबोधन, अंमलबजावणी, कार्य, प्रचार, प्रसार, साहित्य, पोलिस व न्याय व्यवस्थेसह संबंधीतांचे प्रशिक्षण, बाधीतांना मानसिक आधार व तातडीचे पुनर्वसन देण्याची व्यवस्था, अन्यायग्रस्त ततक्रारदार व पिडीतांच्या संरक्षण व पुनर्वसनाची व्यवस्थेची तरतुद आणि सामाजिक न्याय व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी बाधीतांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी तज्ञ व मान्यवरांचीी यंत्रणा यासर्व बाबींच्या कार्यवाहीसाठी महाराष्ट्र शासनाने मा. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत
राज्यस्तरीय समिती गठीत करावी यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती समविचारींसह पाठपुरावा करेल. असे वरील सर्व संकल्प जातपंचायतीला मुठमाती राज्यस्तरीय संकल्प परिषद, जळगांव येथे १ मार्च २०२० रोजी सामुहिकपणे जाहिर करण्यात आले आहेत.