<
जळगाव, (जिमाका) दि. 4:- शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य, त्यांना देण्यात येणारा सकस आहार, निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी यासारख्या विद्यार्थीसाठी मुलभूत असलेल्या सोयीसुविधांकडे आश्रमशाळेतील नियुक्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांनी प्राधान्याने लक्ष द्यावे. अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिल्यात.
जिल्ह्यातील 16 शासकीय आश्रमशाळांसाठी नियुक्त पालक अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलच्या प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, शासकीय आश्रमशाळांसाठी नियुक्त पालक अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, आश्रमशाळांसाठी नियुक्त पालक अधिकाऱ्यांनी आश्रम शाळांना प्रत्यक्ष भेटी देवून पाहणी अहवाल सादर केले आहेत. त्यांनी केलेल्या सूचनांनुसार आवश्यक ते बदल तात्काळ करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. पालक अधिकारी यांनी आश्रमशाळांसाठी संरक्षक भिंत, क्रीडांगण, विद्यार्थी निवास व्यवस्था, भोजन कक्ष, स्नानगृह, भोजन साहित्य या आणि तत्सम व्यवस्थेबद्दल उपस्थित केलेल्या सूचनांना संबंधित विभागाने गांभीर्याने घ्यावे. विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या मुलभूत सुविधांच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात.
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी संबंधित शिक्षकांना विशेष प्रशिक्षणासाठी पाठवावे तसेच विशेष तज्ञ शिक्षकांचे अध्ययन शिबीरांचे आयोजन करावेत. आश्रमशाळांमधील दुरदर्शन संच नेहमी सुस्थितीत राहतील याची दक्षता घेवून दुरदर्शनवरील विद्यार्थी हिताचे कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखवावेत त्यासाठी रिमोट हा मुख्याध्यापक कक्षात असावा व कार्यक्रमाचे वेळापत्रक निश्चित करून ते सूचना फलकावर लावावे. विद्यार्थींनींच्या आरोग्याविषयी अधिक सतर्कता बाळगून आश्रमशाळेच्या महिला शिक्षिका व कर्मचारी यांनी तशी नोंदवही ठेवावी. शेवटी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सर्व पालक अधिकाऱ्यांनी आपल्याला नेमुन दिलेल्या आश्रमशाळेतील खरी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी महिन्यातून किमान एकदा अचानक भेट देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.