<
दुकान नं. ३८/२ मधील लाभार्थ्यांना धान्यच नाही
जळगांव(चेतन निंबोळकर)- येथील पुरवठा विभागाच्या अर्थपुर्ण सहयोगाने जळगावातील काही भागात स्वस्त धान्य वाटपालाही लॉकडाउन असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच लाभार्त्यांवर देखील मुजोरी करताना दिसून येत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गोपनीय तपासणी करून सदर दुकानावर तसेच दुकान मालकाशी आर्थिक हित संबंध जोपासलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जनसामान्यांची आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील मेहरूण परिसरातील तांबापुरा भागातील दुकान क्रमांक ३८/२ चा मनमानी कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. आज संपूर्ण राज्यासह देशात कोरोना विषाणूच्या महामारीशी देशासह राज्य दोन हात करताना दिसत आहे. तसेच या महामारीच्या साखळीला थांबवण्यासाठी संपूर्ण देशासह राज्य सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत. तसेच या महामारीच्या साखळीला थांबवण्यासाठी संपूर्ण देशासह राज्यात २१ दिवसांचा लॉकडाउन पाळण्यात आला आहे. हा लॉकडाउन देश हिताचा असला तरी यामध्ये मोलमजुरी तसेच हातावर पोट भरणाऱ्यांवर एक प्रकारचं संकट कोसळल्याचे चित्र दिसत आहे. तरी या लॉकडाउनच्या परिस्थितीला सामन्यांसह गरीब मोलमजुरी करणारे प्रतिसाद देताना दिसत आहे. राज्यातील मोलमजुरी करणाऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने राशन वाटपा बाबत आदेश पारित करत सर्व लाभार्थ्यांना लवकर धान्य देण्याबाबत सांगितले, मात्र स्थानिक प्रशासन हा आदेश धाब्यावर बसवत, काही स्वस्त धान्य दुकानदार लाभार्त्यांवर मुजोरी करताना दिसून येत आहे. असाच प्रकार शहरातील मेहरूण परिसरातील ३८/२ या दुकानावर आज घडला. या दुकानावरील शिधापत्रिका धारक आज येथे आपल्या हक्काचे धान्य घेण्यासाठी गेले असता या दुकान मालकाने शासनाकडून धान्य आले असताना देखील धान्य वितरीत न करता चक्क दुकान बंद करून घरी निघून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत लाभार्थ्यांनी विचारणा केली असता, दुकान मालकाने पोलीस मागवून धान्य काय मागता? आता दणके खा! असे गलिच्छ उत्तर गरीब लाभार्थ्यांना दिले. यावेळी येथील हताश झालेल्या लाभार्थ्याने जळगांव जिल्हा जागृत जनमंचच्या अध्यक्षांना फोन केला व घडलेली सर्व आपबिती सांगितली, लागलीच जागृत जनमंचच्या अध्यक्षांनी जिल्हा पुरवठाधिकारी व तहसीलदारांशी संपर्क साधत दुकान मालकावर कारवाई करण्याचे सांगितले शेवटी आपल्या दुकानावर कारवाई होईल या भीतीने त्या दुकान मालकाने दुकान उघडून धान्य वितरीत केले.
या दुकान मालकाने सोशल डिस्टनिंगचे वाजवले बारा
या दुकान मालकामध्ये व लाभार्थ्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याने लाभार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर आपले दुकान बंद होईल या भीतीने दुकान सुरु केले, पण कोरोनाची साखळी रोखण्यासाठी सोशल डिस्टनिंग शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत सोशल डिस्टनिंगचे बारा वाजवल्याचे निदर्शनास आले.
यापूर्वी ही या दुकानाच्या अनेक तक्रारी
अनेक बेरोजगार कुंटुबाची पोटाची खळगी भरण्यासाठी अशी स्वस्त धान्य दुकाने मोठा आधार आहेत. तरी या दुकानाच्या लाभार्थ्यांना स्वस्त धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे नाईलाज म्हणून नागरिकांना खुल्या बाजारातून महागडे धान्य विकत घ्यावे लागत आहे. याबाबत अनेकानी लेखी तक्रारी पुरवठा विभाग व तहसीलदार यांचेकडे केल्या आहेत पंरतू धान्य दुकानदाराशी अर्थपुर्ण तडजोडी असल्याने त्या परस्पर मिटवून अशा एकाद्या तक्रारदाराची मागणी मान्य करून आवाज दाबला जात आहे. स्वस्त धान्य मिळत नसल्याने अनेक कुंटुबावर आता उपासमारीची वेळ आल्याचेही जनसामान्यांचे म्हणणे आहे. तसेच या दुकानावर कारवाई करण्याची मागणी जनसामान्य करीत आहे. तसेच, एका जणाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगातले की, रेशन मिळण्याची थंब प्रोसेस मागील एक ते दीड वर्षापासून सुरू आहे. तरी देखील अद्याप ती पुर्ण झालेली नाही. चार-चार वेळा कागदपत्रे देऊन देखील कुटुंबाची नावे व त्यांचा आर.सी. नंबर का येत नाही? त्याला कारणीभूत कोण? गेल्या एक ते दीड वर्षापासून वारंवार या दुकान मालकाकडे विचारणा केली असता लोकांना तहसील कार्यालयात जा व तहसील कार्यालयात गेल्यावर पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी सांगतात तुम्ही तुमच्या दुकानदारांनाच कागदपत्रे द्या, अशा पद्धतीने दिशाभूल केली जात आहे. तसेच एखाद्या कुटुंबातील मयत व्यक्ती असतानाही ते नाव कमी न करताच वर्षानुवर्ष धान्याची उचल दाखवित असल्याचे काही तक्रारी आहेत. पंरतू त्याउलट एखादे नाव वाढले तर अशा कुटुंबाना वर्षभर नाव आले नाही म्हणून धान्य देण्यास टाळाटाळ केली जाते याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
पुरवठा विभागाच्या डोळ्यावर आर्थिक पट्टी
पुरवठा विभागाचा मनमानी कारभार सुरू आहे. ते धान्य दुकानदार कोठे धान्य विकतात यांची चौकशीच करत नाहीत. मात्र धान्य घेतानाच पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याना चारअंकी नियमबाह्य नोटाचा पुरवठा करावा लागतो. नाहीतर असा पुरवठा न करणाऱ्या दुकानदाराचा धान्य पुरवठा विविध कारणे काढून बंद केला जात असल्याचे काही धान्य दुकानदार खाजगीत सांगतात.