जळगाव-(प्रतिनिधी) – शहराच्या विकासासाठी व नागरिकांच्या सोयीसाठी जळगाव महानगरपालिकेच्या हद्दगीर गट नंबर १५५९ सिटी सर्व्हे क्र. १६६२ बेरडशेट सोसायटी समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण तसेच परिसराचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव जळगाव समितीचे अध्यक्ष श्री. आशिष उत्तमराव सपकाळे यांनी केली आहे.
या संदर्भात, त्यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना दिनांक १७/१०/२०२३ रोजी निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण असते. परंतु, याच भागात काही समाजकंटकांनी पुतळ्याच्या परिसराचे विद्रुपीकरण केले होते, ज्यामुळे नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता.

यावर तातडीने कार्यवाही करत जिल्हाधिकारी तसेच मनपा आयुक्तांनी लक्ष घालून या जागेवरील सुशोभीकरणाचे आणि परिसराच्या विकासाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या कार्याची आठवण ताजी होते, त्या ठिकाणी सुशोभीकरण आणि विकास होणे आवश्यक आहे. या मागणीमुळे जळगाव शहराच्या सौंदर्यात भर पडेल आणि नागरिकांच्या भावनांचा आदर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. आशिष उत्तमराव सपकाळे, सल्लागार सतीश गायकवाड उपाध्यक्ष भारती रंधे सचिव निलू इंगळे तृषाल सोनवणे कार्यदक्ष सचिन सरकटे जितेंद्र केदार राज कोळी अभिजीत रंधे राजू डोंगरे मिलिंद शिरसाट दिपक सोनवणे मंगल भालेराव सल्लागार हरिश्चंद्र सोनवणे कार्याध्यक्ष मुकुंद सपकाळे, सतीश गायकवाड, आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या कामासाठी पुढाकार घेतला आहे.











