जळगाव, दिनांक 10 जून (जिमाका) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जून-जुलै २०२६ या कालावधीत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) पुरवणी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. इयत्ता १० वीची परीक्षा दि. १६ जून ते ३० जून २०२६ तर इयत्ता १२ वीची परीक्षा दि. १६ जून ते ८ जुलै २०२६ या कालावधीत होणार आहे.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या परीक्षे संदर्भातील पुर्व तयारीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी श्री.घुगे यावेळी म्हणाले, दहावी व बारावीच्या परिक्षा संदर्भातील नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी आप-आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, संबधित प्रत्येक यंत्रणने समन्वयाने काम करावे, परिक्षा नियोजन बध्द पघ्दतीने पार पडतील यासाठी सर्वांनी दक्ष रहावे, सर्व परिक्षां केंद्रावर सी सी टि व्ही यंत्रणा कार्यान्वीत असणे आवश्यक आहे, परिक्षा काळात, परिक्षा केंद्राचा वीज पुवरठा खंडीत होणार याची दक्षता विद्युत विभागाने घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्यांत.

जळगाव जिल्ह्यात इयत्ता १२ वीसाठी ८ परीक्षा केंद्रे व इयत्ता १० वीसाठी १४ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच १२ वीसाठी ८ परिरक्षक केंद्रे आणि १० वीसाठी ७ परिरक्षक केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

इयत्ता १० वीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील १४ परीक्षा केंद्रांवर एकूण २,९०० विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यामध्ये २,१२४ मुले व ७७६ मुलींचा समावेश आहे.

इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ८ परीक्षा केंद्रांवर एकूण २,७३३ परीक्षार्थी सहभागी होणार आहेत. यामध्ये विज्ञान शाखेचे ८६२, कला शाखेचे १,३७६, वाणिज्य शाखेचे ४०९, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे ८५ आणि आयटीआयचा १ परीक्षार्थी समाविष्ट आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जळगाव जिल्ह्यातील १० वी व १२ वीच्या परीक्षांसाठी एकही उपद्रवी परीक्षा केंद्र घोषित केलेले नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या बैठकीला जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण, उपशिक्षणाधिकारी (माध्य) सतीष परदेशी यांच्यासह पोलीस विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणचे अधिकारी, इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.










