<
जळगाव(प्रतिनिधी)- उद्योजकता हा एकाकी प्रवास आहे. त्यामध्ये आपल्याला अपयशाला न घाबरता वेगवेगळ्या प्रात्याक्षिकावर काम करणे गरजेचे असते. काही वेळेस इनोव्हेशनमध्ये अपयश येणे हेही फायदेशीर असते कारण अपयशानंतर व्यक्ती अधिक जागरुक होवून अचूक बनतो आणि नवनविन संधीचे दरवाजे आपल्यासाठी उघडतात. त्याकरीता गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात इनोव्हेशन व स्टार्ट अप वर मंगळवार, १६ नोव्हेंबर रोजी इन्स्टीट्यूशन इनोव्हेशन सेलच्या माध्यमातून सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.
या सेमिनारसाठी प्रमुख वक्ते म्हणून १०००० स्टार्टअप इंडियाचे को-फांऊडर अॅड सीईओ लिनेश सिंग हे उपस्थीत होते. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय पाटील, महाविद्यालयाचे अॅकेडमीक डिन प्रा.हेमंत इंगळे हे उपस्थीत होते. प्रास्ताविकात डॉ.विजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्टार्ट अप संदर्भात विस्तृत माहिती देताना, त्याचे महत्व समजावून सांगितले. उच्चशिक्षणासंबंधित तसेच उद्योगजगतेबाबत सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. त्यासंबंधित असलेल्या निधींबद्दलही मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या स्टार्टअप साठी नेहमी तयार असावे व त्यासाठी प्रयत्नशीलही असावे, असे आवाहनही डॉ.पाटील यांनी केले.
याप्रसंगी लिनेश सिंग यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि स्टार्ट अप या विषयावर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी जिज्ञासु वृत्ती बाळगणे गरजेचे आहे, जेणेकरुन नवनविन स्टार्ट अप च्या कल्पना वाढीला लागतील. तसेच स्टार्ट अप सुरु करण्यासाठी प्रथम अडचणींवर लक्ष केंद्रित करायचे आणि त्यानंतर जे उत्तर येईल तेच आपले स्टार्ट अप असते असे मानावे, असे उदाहरणासहित विद्यार्थ्यांना स्पष्ट करुन दिले.
एक विद्यार्थी ते सीईओ ऑफ १०००० स्टार्ट अपपर्यंतचा प्रवास अतिशय रंजकतेने त्यांनी विद्यार्थ्यांना विषद केला, त्याचप्रमाणे त्यांना यासंदर्भात आलेल्या अनुभवाचे स्टार्ट अप मध्ये परिवर्तन कसे करायचे याचा सुलभ मार्ग त्यांनी समजावून सांगितला. स्टार्ट अप सुरु करण्याआधी प्रोडक्ट व मार्केटवर आपला फोकस असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ते करण्यासाठी विविध मार्ग वापरण्यासंदर्भात महत्वपूर्ण मुद्दे त्यांनी मांडले. बॅकींग सिस्टीममध्ये व्हेचर फंड अधिक लाभदायक असतो आणि व्हेंचर कॅपिटल फंड यांच्या माध्यमातून हा फंड वितरित केला जातो. हि नविन माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
स्टार्ट अप करीत असतांना रिस्क आणि फेल्युअर याकडे लक्ष देणे गरजेचे असते, तसेच नोकरी आणि स्टार्ट अप यातील फरक उदाहरणासहित त्यांनी सांगितला. देशभरात जवळपास ४३००० कंपनी स्टार्टअप मध्ये दरवर्षी येतात. परंतु त्यातील काही निवडक कंपन्यांना स्टार्ट अपसाठी निधी मिळतो आणि काही कंपन्या यशस्वी होतात. स्टार्ट अप मध्ये भागीदारी असेल तर कंपनीचे भागीदार हे वेगवेगळ्या गुणांनी अवगत असले पाहिजे जेणेकरुन स्टार्ट अप लवकर वृद्धींगत होईल.
सेमिनारच्याशेवटी विद्यार्थ्यांच्या स्टार्ट अप संबधित प्रश्नांना त्यांनी मुद्देसुद उत्तरे दिली. यावेळी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख व विद्यार्थ्यांची उपस्थीती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यंत्र विभागाचे प्रा.योगेश वंजारी यांनी केले.