<
जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि.17 – सन 2017 पूर्वी अधिसूचित वैद्यकीय उपकरणे यांच्यावर नियंत्रण, औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम अंतर्गत केले जात होते. मात्र अधिसूचित वैद्यकीय उपकरणे यांची यादी अत्यल्प होती सन 2017 मध्ये केंद्र शासनाने औषधे व सौदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत वैदयकीय उपकरणे नियम 2017 पारित केले आहेत. या नियमानुसार रुग्णांच्या उपचारासाठी व रोग निदानासाठी लागणाऱ्या बऱ्याच वेगवेगळया उपकरणांचा त्यामध्ये अंतर्भाव केलेला असून वैद्यकीय उपकरणांचे अ ब क व ड अशा वर्गवारी केली आहे अ व ब या प्रवर्गातील वैद्यकीय उपकरणांवर राज्याचे नियंत्रण आहे आणि क व ड या प्रवर्गातील वैद्यकीय उपकरणांवर केंद्र शासनाचे नियंत्रण आहे.
वैद्यकीय उपकरणांची व्याप्ती व उपलब्धता विचारात घेता केंद्र शासनाच्या दि. 11 फेब्रुवारी, 2020 रोजीच्या अधिसूचनेव्दारे जे उत्पादक वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन करतात त्यांनी त्यांच्या वैद्यकीय उपकरणांबाबत केंद्र शासनाने तयार केलेल्या सुगम पोर्टल (www.cdscomdonline.gov.in) या संगणक प्रणालीवर ऐच्छिक नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर नोंदणी ही 18 महिन्याच्या आत म्हणजे 30 सप्टेंबर, 2021 पर्यंत करणे अपेक्षित होते. त्यानंतर 1 वर्षासाठी दिनांक 30 सप्टेंबर, 2022 पर्यंत सर्व वैद्यकीय उपकरणांचे उत्पादक यांनी त्यांच्याव्दारे उत्पादित वैद्यकीय उपकरणांबाबत केंद्र शासनाच्या संगणक प्रणालीवर नोंदणी करणे अनिवार्य (Mandatory) केलेले आहे. तरी राज्यातील सर्व वैद्यकीय उपकरणे उत्पादक यांना अन्न व औषध प्रशासनाव्दारे आवाहन करण्यात येते की, ज्या उत्पादकांनी नोंदणी विहित मुदतीत केली जाणार नाही त्यांच्या विरुध्द औषधे व सौदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत सक्त कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी , असे
सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.