<
गांधी रिसर्च फाऊंडेशन व इंडियन काऊंसिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “हाऊ गांधी कम्स अलाइव्ह” व्याख्यानमालेत प्राचार्य आनंद उकिडवे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टचे अध्यक्ष किशोर चोपडे, सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद राठी, वक्ते नागपूर येथील वंडरग्रासचे संचालक वैभव काळे आणि बोलताना गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या रिसर्च डीन प्रा. गीता धर्मपाल
जळगाव, दि. 6 (प्रतिनिधी) – राजकीय स्वातंत्र्याबरोबरच पूर्ण स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याची गरज, त्याचप्रमाणे भारतीय परंपरांचा डोळस अभ्यास भारतीयांचे मानसिक परिवर्तन घडवून आणेल असे प्रतिपादन गांधी रिसर्च फाऊंडेशन व इंडियन काऊंसिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गांधी रिसर्च फाउण्डेशन च्या संयुक्त विद्यामाने, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आणि गांधी जयंती निमित्त आयोजित “हाऊ गांधी कम्स अलाइव्ह” व्याख्यानमालेतील वक्ते नागपूर येथील वंडरग्रासचे संचालक वैभव काळे व आयोजन कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य आनंद उकिडवे यांनी केले. याप्रसंगी मंचावर सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद राठी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टचे अध्यक्ष किशोर चोपडे, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या रिसर्च डीन प्रा. गीता धर्मपाल यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा. गीता धर्मपाल यांनी प्रास्ताविक केले. पहिल्या सत्रात वैभव काळे यांनी मार्गदर्शन करतांना बांबू पासून निर्मित घरे आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय दृष्टिकोनातून काळाची गरज असल्याचे सांगितले. आधुनिक घरांची निर्मिती व बांबू पासून घरांची निर्मिती यांचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी मांडला. बांबू पासून बनविलेली घरे दीर्घकाळ टिकण्यासाठी संशोधन करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. पृथ्वीवरील जीवसृष्टीला आव्हान देणाऱ्या जीवनशैलीचा त्याग करून गांधीजींच्या विचारांवर वाटचाल करणारी शाश्वत जीवनशैली स्वीकारणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या “सुचिता” स्वच्छता गृहांची यशोगाथा त्यांनी सांगितली. तसेच नागपूर, वर्धा, पुणे आदी ठिकाणी बांबूपासून साकारलेल्या प्रकल्पांची माहितीही दिली.
दुसऱ्या सत्रात प्राचार्य उकिडवे यांनी भारतीय परंपरांना अस्पृश्य न मानता त्याचा सारासार विवेकाने विचार केला पाहिजे. शुद्धता व सात्विकता हीच भारतीय परंपरांची ओळख आहे. देशातील अनेक वारसा स्थळांचे दाखले देत त्यांनी श्रोत्यांना अंतर्मुख केले. निर्मितीसाठी केवळ कौशल्याची आवश्यकता नसून त्यासाठी साधना, स्वामित्वाची गरज त्यांनी प्रतिपादित केली. विचार, सहभाग, कौशल्य व ज्ञान यातून साधना होते. साधनेतून होणारी निर्मिती सामान्यजनांना आश्चर्यकारक वाटते मात्र ती वास्तव असते. भारतीय स्थापत्य कलेची अनेक दाखले देत त्यामागील तंत्रज्ञांची माहिती त्यांनी दिली. कार्यशाळेचे संचालन गिरीश कुळकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. निर्मला झाला यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी, इंजिनीअर्स व वास्तुविशारद मोठ्या संख्येने उपस्थित होते.