<
आपल्या घरात वाढणारं मूल चार-पाच वर्षांचं झालं की त्याला स्वओळख निर्माण व्हायला लागते. मुलगा आणि मुलगी यांच्यातला शारीरिक फरक लक्षात येतो आणि मुलं-मुली वेगळे दिसतात इतपत नोंद त्यांचं मन घेत असतं.
बाबाला मिशा असतात मग आई तुला का नसतात? आई, तू बाबापेक्षा वेगळी का दिसतेस? आई आणि बाबा निरनिराळ्या पद्धतीचे कपडे का घालता? असले प्रश्न मुलांना पडायला लागतात. आणि ते स्वाभाविकच आहे. पण मुलं स्ट्राँग आणि मुली कमजोर किंवा रडक्या हा संदर्भ शरीरा पलीकडचा असतो.
आणि चिमुकल्या वयात मुलं पहिल्यांदा फक्त वाढत जाणा-या शरीरात होणारे बदल, आकारमानात होणारे बदल तेवढे नोंदवत असतात. मग लिंगभेदाचे विचार त्यांच्या मनात रुजतात कुठून? तर हे दुष्कृत्य करणारे आपणच असतो.या टप्प्यात पालक म्हणजे फक्त आई-बाबा नाहीत. तर आजी-आजोबा, जवळचे-लांबचे नातेवाईक, शेजारचे पाजारचे, शाळेतले शिक्षक आणि असे सगळे मोठे जे मुलांच्या संपर्कात आहेत.
आपलं मोठ्यांच जग कळतनकळत लहान मुलांच्या मनात लिंगभेदाच्या कल्पना रुजवतात. आपल्या समाजात दोन संकल्पना मुलं फार लहान असताना शिकतात..एक म्हणजे लिंगभेद आणि दुसरी म्हणजे रंगभेद. मुलांसाठी; मुलीसारखं काय रडतोस? आणि मुलींसाठी; किती दांडगट आहे ही? हे उद्गार आपण आपल्याही नकळत वापरतो आणि चिमुकल्या वयात मुलगा आणि मुलगी यांनी नेमकं कसं वागलं पाहिजे याच्या अत्यंत चुकीच्या कल्पना लहानग्यांच्या मनात निर्माण करतो.
ती गोरीपान आणि सुंदर आहे, तो किती काळा आहे ना, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कळत नकळत मुलांच्या मनात आपण रुजवतो की गोरं म्हणजे छान, सुंदर, सुरेख आणि काळं म्हणजे वाईट, दुय्यम. आपल्या लक्षातही येत नाही की आपण मुलांना आपल्याही नकळत काय काय शिकवून बसतो. या गोष्टी सोडून देऊन, रंगभेद-लिंगभेद करणारे शब्द टाळून मुलांशी गप्पा मारता येतील का आपल्याला? टीव्ही बघताना तीच नाक बघ कसं आहे, ती किती जाड आहे ना अशी वाक्य आपण सहज बोलतो, हे टाळू शकतो का?