<
काही महिन्यांपूर्वी एका केसमध्ये परस्पर सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला. या निर्णयाच्या संदर्भात ‘परस्पर सहमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांना लग्नाचं खोट वचन देऊन बलात्कार केला असं म्हणता येणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाच म्हणणं योग्यच आहे’ असा पोल प्रकाशित केला होता.
परस्पर सहमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधाना लग्नाचं खोटं वचन देऊन बलात्कार केला असं म्हणता येणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं योग्यच आहे.
सहमत (80%, 793 Votes)
असहमत (12%, 124 Votes)
सांगता येत नाही (8%, 80 Votes)
Total Voters: 997
या केसविषयी व्यवस्थितपणे जाणून घेतले तर लक्षात येते की कोर्टासमोर ज्या बाजू आलेल्या आहेत त्यामध्ये महिलेला सर्व परिस्थितीची पूर्व कल्पना होती व परस्पर सहमतीने शरीर संबंध ठेवलेले आहेत असे उघड होते. त्यामुळे अशा संबंधांना फसवणूक किंवा लग्नाचं खोट वचन देऊन बलात्कार केला असं म्हणता येणार नाही हे न्यायालयाने सांगितलं आहे. अशा स्थितीसंदर्भात विचार केला तर कोर्टाचा हा निर्णय बऱ्याच जणांना योग्य वाटला. कारण विशिष्ट स्थितीमुळे एखाद्याला दोषी ठरवण चुकीचं आहे.
विशिष्ट हेतू – दबाव – फसवणूक – दोषारोप
ही जरी एक बाजू असली ज्याठिकाणी पुरुषावर चुकीचे आरोप लावले जाऊ शकतात किंवा परिस्थितीचा गैरफायदा घेऊन फसवणूक केली जाऊ शकते. परंतु अशा घटनांचे प्रमाण तरी किती आहे आपल्याला माहित आहेच. पण दुसरी बाजू घेतली तर लक्षात येतं की लैंगिक शोषणाच्या, अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटना घडतात यामध्ये महिलांवर होणाऱ्या हिंसेचं प्रमाण हे प्रचंड आहे. अमिष दाखवून, धमकी देऊन, फसवणूक करून महिलेच्या आर्थिक, भावनिक, शारीरिक असहाय्यतेचा गैरफायदा घेणारे पुरुष समाजात आहेत. कधीकधी पुरुषही एखाद्या फसवणुकीला बळी पडू शकतात. त्यामुळे स्त्रिया अशाच असतात किंवा पुरुष तसेच असतात असा दोषारोप न करता पिडीत व्यक्तीला न्याय मिळवून देणं हे महत्वाचं असतं.
नातं कोणतही असो पण एकमेकांना कोणत्याही गोष्टीसाठी गृहीत धरणं हे चुकीचंच आहे. शारीरिक संबंधांमध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींची या कृतीसाठी परस्पर संमती असणं महत्वाचं आहे. काही काळ एकमेकांसोबत राहून परस्पर सहमतीने शरीर संबंध प्रस्थापित झाल्यानंतर आपल्या विशिष्ट हेतू पूर्ततेसाठी समोरील व्यक्तीवर दबाव आणणं किंवा आपली फसवणूक झाली असं म्हणणं हे चुकीचं आहे.
जबाबदारी कुणाची?
बहुतेक वेळा अशा नात्यामध्ये जोडपी ज्याप्रकारे मानसिक/भावनिकरित्या जोडलेली असतात त्याचीच पुढची पायरी ही शारीरिक संबंधांकडे जाण्याची दाट शक्यता असते. जर मनाने आपण जवळ असू व शारीरिक ओढ दोघांनाही जाणवत असेल तर सुरक्षित शारीरिक संबंध आल्यास त्यात वावगं काय आहे? पण हे शारीरिक संबंध त्या वेळची गरज म्हणुन पाहणार की भविष्याचा विचार करुन केलेली तरतुद असणार? अशा लैंगिक संबंधांना जर हो किंवा नाही अशी द्विधा मन:स्थितीत असल्यास त्याबाबत नेमके व स्पष्टपणे याबाबत एकमेकांशी बोलायला हवं की नको? अन महत्वाचे म्हणजे नात्यामध्ये जे घडेल त्याची जबाबदारी दोघेही घेणार की नाही?
अठरा वर्षाखाली बालकांसाठी कायदा काय सांगतो.
संमती शिवाय शारीरिक संबंध ठेवणं हा कायद्यानं गुन्हा मानला जातो. शरीर संबंधांमध्ये परस्पर सहमती जरी महत्वाची असली तरी, यातील एखादी व्यक्ती अल्पवयीन (अठरा वर्षाखालील) असेल तर त्या व्यक्तीची संमती ग्राह्य धरली जाऊ शकत नाही असे कायदा सांगतो.
‘स्रोत – तथापि ट्रस्ट निर्मित Let’s Talk Sexuality – सेक्स आणि बरंच काही’