<
स्वच्छता ठेवा अन्यथा दंडात्मक कारवाई : प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
जळगाव, दि.२२ – जळगाव शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मनपा प्रशासनासह नागरिकांची देखील आहे. मनपा प्रशासनाकडून आपल्यापरीने प्रयत्न करण्यात येत असले तरी ते तोडके ठरत आहे. आम्ही १०० टक्के शहर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करू. ‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’ हा मूलमंत्र ध्यानी ठेवत प्रत्येकाने शहर स्वच्छ ठेवण्यास हातभार लावावा, असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे.
जळगाव शहर स्वच्छ करण्याचा ध्यास महापौर भारती कैलास सोनवणे यांनी घेतला आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी तीन दिवसांपूर्वी सकाळी अचानक तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर मनपा कर्मचाऱ्यांचा उपयोग करून दररोज शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.
१०० टक्के स्वच्छतेचा प्रयत्न
शहरात वॉटरग्रेस आणि मनपा प्रशासनाच्या ८४० कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम राबवली जात होती. परंतु तरीही स्वच्छता नसल्याचे चित्र होते. गेल्या दोन दिवसांपासून मनपाच्या केवळ ४४० कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शहर १०० टक्के स्वच्छ करण्यास मनपा प्रशासन कटिबद्ध असल्याचे महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले.
नेमका कुठे होतो घोळ?
मनपा प्रशासनाकडून शहरात सकाळी स्वच्छता करण्यात येते मात्र काही वेळातच दुकानदार, व्यावसायिक, भाजीपालावाले, खाद्यपदार्थ विक्रेते आणि नागरिकांकडून कागद, कॅरीबॅग, भाजीपाला व इतर कचरा रस्त्यावर टाकण्यात येतो. थोडे थोडे करीत बराच कचरा रस्त्यावर विखुरतो आणि शहर पुन्हा अस्वच्छ दिसू लागते.
जळगावकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन
शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मनपासह प्रत्येक जळगावकर नागरिकाची आहे. शहरातील प्रत्येक दुकानदाराने, भाजीपाला विक्रेत्याने, व्यावसायिकाने आपल्या दुकानाबाहेर कचरा संकलनासाठी बादली (डस्टबीन) ठेवावे आणि ते देखील शक्य नसेल तर एखादा रिकामा खोका ठेवावा. जेणेकरून सर्व कचरा त्यात संकलित करता येईल. दररोज जमा झालेला कचरा घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे.
..तर दंडात्मक कारवाई करणार
शहर स्वच्छ ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. उघड्यावर कचरा टाकणे कायद्याने गुन्हा आहे. शहर स्वच्छतेसाठी हातभार न लावल्यास मनपा प्रशासनाला दंडात्मक कारवाई करावी लागेल, असे महापौर भारती सोनवणे यांनी कळवले आहे.
मनपाकडे करा तक्रार
शहरातील स्वच्छता करण्यासाठी मनपा प्रशासन कटिबद्ध आहे परंतु तरीही स्वच्छता होत नसल्यास किंवा घंटागाडी न आल्यास नागरिक आपली तक्रार नोंदवू शकतात. नागरिकांनी स्वच्छता अँपवर जाऊन तक्रार नोंदवावी किंवा महापौर कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे.
गोलाणीत स्वच्छता मोहीम, चौघांना दंड
गोलाणी मार्केटमध्ये शनिवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी महापौर भारती सोनवणे, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती अँड.शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, नितीन लढ्ढा, शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, भाजप गटनेते भगत बालाणी, आरोग्यधिकारी विकास पाटील, शहर अभियंता सुनील भोळे आदी उपस्थित होते. गोलाणी मार्केटमध्ये मोहीम राबविताना चार दुकानदारांना दंड करण्यात आला. कारवाई होताच इतरांनी लागलीच स्वतःच्या दुकानाबाहेरील कचरा साफ केला. गोलाणी परिसरातून २ दोन ट्रॅक्टर आणि १ घंटागाडी भरून कचरा गोळा करण्यात आला.
६ ट्रॅक्टर माती उचलली
शनिवारी शहरातील काव्यरत्नावली चौक ते गणपती मंदिर, काव्यरत्नावली चौक ते सागर पार्क, स्वातंत्र्य चौक ते देशपांडे मार्केट, बॉम्बे लॉज ते नेल्सन मंडेला चौक या मुख्य रस्त्यावरील दुभाजकाशेजारील माती जमा करण्यात आली. ३२ मजुरांनी जवळपास ६ ट्रॅक्टर माती जमा केली.